
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई -राज्यातील अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर शिंदे गटासह भाजप सरकार स्थापन करत आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्याची घोषणा करून फडणवीसांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी मी स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असंही स्पष्ट केलं. परंतु यावर जेपी नड्डा यांनी माध्यमांना माहिती दिली की, फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी पक्षाची इच्छा आहे.
काय म्हणाले जेपी नड्डा?
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा माध्यमांना म्हणाले की, आमचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले की, आमचे पुढचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील. याशिवाय भाजप पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत असेल. हे आमच्या कोणत्याही पदाची लालसा नाही तसेच आमचे चरित्र दर्शवते. महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. परंतु भाजपच्या केंद्रीय टीमने असे ठरवले आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सत्तेत सहभागी व्हावे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे आणि जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण कराव्यात.’
फडणवीसांनी पक्षाचे नवे निर्देश
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितलेल्या पक्षाच्या इच्छेनंतर हे स्पष्ट झाले आहे की, फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी करून घ्यायचे आहे. परंतु फडणवीस स्वत: मात्र सत्तेत सहभागी होण्यास तयार नव्हते. फडणवीसांची मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा जगजाहीर आहे. परंतु तरीही त्यांनी आज एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन स्वत: सत्तेबाहेर राहण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. परंतु आता भाजपने दिलेल्या नव्या निर्देशांनंतर फडणवीस आणि भाजपचे काही बिनसले आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
माझ्या मित्रावर अन्याय… – नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीला म्हटले की, सर्वांनाच फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी अपेक्षा होती. त्यांच्या पक्षात काय चाललंय याची मला माहिती नाही. परंतु माझ्या मित्रावर अन्याय होतोय. मी सकाळीच म्हटलं होतं की, माझ्या मित्राला माझ्या शुभेच्छा. पण असं घडत नाहीये.
अमित शहांनी दिल्या शुभेच्छा..
जेपी नड्डांनी केलेल्या आवाहनानंतरच थोड्या वेळाने केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ट्वीटरवरून देवेंद्र फडणवीस सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये शहा म्हणाले की, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय त्यांच्या महाराष्ट्राप्रति असलेल्या खऱ्या निष्ठेचे आणि सेवेचे द्योतक आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.’