
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी – रामेश्वर केरे
स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कृषि क्षेत्रातील भरीव योगदानामुळे 1 जुलै हा त्यांचा जन्मदिवस ‘कृषि दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग वसंतराव नाईक यांनी राज्यात राबविले यात दूग्धक्रांती, रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार योजना यासारख्या शेतीस पूरक उपक्रमांची अंमजबजावणी त्यांनी केली. शेतकऱ्यांनी बदलत्या काळानूसार नवीन तंत्रज्ञान वापरून विविध प्रयोग शेती आणि जोड व्यवसायात करावेत. यामुळे शेतकरी कर्जबाजारी न होता. आर्थिक संपन्न होण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि दिनानिमित्त कृषीसंजीवनी मोहिम समारोपाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
कृषि विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ संचलित, कृषि विज्ञान केंद्र औरंगाबादच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण व कृषि भूषण पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी निलेश गटणे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तुकाराम मोटे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक किशोर झाडे, हिमायतबाग फळ संशोधन केद्रांचे प्रभारी श्री.पाटील, तालुका कृषि अधिकारी व्ही.के. देशमुख तसेच कृषि संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषि भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी जगन्नाथ तायडे, सिंकदर जाधव निवृत्ती डिडोरे, पाडुरंग वाघ, राहूल कुलकर्णी, अविनाश गायकवाड यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
शेती व्यवसाय बाबतची दुय्यमत्वाची भावना तरुण शेतकऱ्यांनी बदलवण्यासाठी नोकरीपेक्षा शेतीत नवनवीन प्रयोग करावेत, यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, प्रशिक्षण, अर्थसहाय्य, त्याचप्रमाणे शेतीस पुरक असलेल्या दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन या पारंपिरक जोड व्यवसाया बरोबरच पॅकेजिंग, सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातून शेतीला उर्जित अवस्था प्राप्त करुन द्यावे असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमात सांगितले.
स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याची ओळख करुन देऊन जिल्हाधिकारी म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हवामानावर अधारित शेतीतंत्राच्या साह्याने कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारे तंत्र, प्रशिक्षण, अर्थसाह्य केले जात आहे. यात शेडनेट, पॉली हाऊस, शेती अवजार बँक यांच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित शेती केल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असल्याचे सांगितले. गंगापूर व वैजापूर तालुक्यातील माळी सागज व इतर गावातील शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात वापर केला असल्याचे सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यात सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगात देशात प्रथम असून जवळपास 190 शेतकरी उत्पादन कंपन्या जिल्ह्यात स्थापन झाल्या आहेत.
अंबा आणि मोंसबी फळपीकाच्या बाबतीत स्वतंत्र क्लस्टर उपलब्ध असून शेतकऱ्यांनी या फळाचे पॅकेजिंग आणि बाजारपेठ मिळवण्यासाठी शासनामार्फत स्टॉल, फिरते स्टॉल उपलब्ध करुन दिले जात आहेत, याचा शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा. औरंगाबाद हे रस्ते, रेल्वे व विमानवाहतुक या तिन्ही मार्गाने जोडले गेले असल्याने राज्याबरोबर देशात व परदेशात कृषि क्षेत्रातील कच्चा माल निर्यात करणारा जिल्हा म्हणून नावारुपास येत आहे. शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज, खते, बी-बीयाणे उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा प्रशासन वेळावेळी पाठपुरावा करुन कमतरता भासणार नाही याची काळजी घेत आहे. केशर अंबा उत्पादन शेतकऱ्याने GIS मानाकंनासाठी नोंदणी करण्याचे अवाहनही चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तुकारात मोटे यांनी कृषी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी सुसंवाद कार्यक्रमातून शेतकऱ्यांनी अनुभवाचे आदान-प्रदानातून आर्थिक प्रगती साध्य होत असून अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन कृषि विभाग करीत असतो. त्याचप्रमाणे या विभागाअंतर्गत ‘विकेल ते पिकेल’ कृषि संजीवनी सप्ताहात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला असल्याचे सांगितले.
कृषि दिनाच्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.