
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
उदगीर / प्रतिनिधी
मौजे गव्हाण ता. जळकोट येथील रमाई आवास योजनेच्या फॉर्मवर सरपंच सह्या करीत नसले बाबतची तक्रार लाभार्थी अर्जदार बालाजी ग्यानोबा घोडके यांनी केली असून फार्मवर सहय्या न केल्यास ५ जुलै पासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा गटविकास अधिकारी पंचायत समिती जळकोट, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर, तहसीलदार तहसील कार्यालय जळकोट, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन जळकोट यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात अर्जदार बालाजी गानोबा घोडके यांनी रमाई आवास योजनेअंतर्गत मला घरकुल मंजूर असून बऱ्याच दिवसांपासून सतत पाठपुरावा करूनही व वारंवार अर्ज करूनही चौकशी अंति मंजूर घरकुल बांधकामासाठी पुढील आर्थिक कारवाईसाठी आमच्या गावचे सरपंच घरकुल फॉर्मवर स्वाक्षरी करण्यासाठी नकार देत आहेत. प्रशासकीय चौकशी झाल्यानंतर ही परिस्थिती असल्यामुळे गटविकास अधिकारी जळकोट सह अनेकांना वेळोवेळी निवेदनाद्वारे अर्जद्वारे घरकुल फॉर्मवर सही मिळावी म्हणून विनंती केली असतानाही आज पावतो कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. याची त्वरित दखल घेऊन लाभार्थी रमाई आवास योजनेच्या फॉर्मवर सरपंच यांनी त्वरित सह्या करावेत अन्यथा ५ जुलै पासून गटविकास अधिकारी पंचायत समिती जळकोट कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे. या निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर, तहसीलदार तहसील कार्यालय जळकोट, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन जळकोट यांना दिली आहे.