
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे, दि.1: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रकिया सुरु करण्यात आलेली आहे.
शासकीय वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतरमागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थीनींना त्या-त्या प्रवर्गात प्रवेश देण्यात येणार आहे.
नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थीनींना प्रवेशाबाबतचा छापील अर्ज, अटी व शासकीय वसतिगृहात मिळणाऱ्या सोयी सुविधाबाबतच्या सविस्तर माहितीसाठी गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पिंपरी-चिंचवड सेक्टर-4, स्पाईनरोड, संतनगर, पथ क्रमांक-8, ॲक्वार्ड हॉस्पिटल शेजारी, मोशी प्राधिकरण-412105 यांच्याशी कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून संपर्क साधावा. शासकीय वसतिगृहाचे प्रवेश अर्ज विनामूल्य मिळतील.
शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थीनींना विनामूल्य भोजन व निवासाची व्यवस्था असून शिक्षण संस्था प्रमुखाच्या शिफारशीनुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरीता आवश्यक असलेली क्रमिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश आदीकरीता विहित रक्कम विद्यार्थीनींच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. तसेच दरमहा रूपये 900 इतका निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. जिल्ह्यातील गरजू व गरीब विद्यार्थीनींनी वसतिगृह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अधीक्षिका श्रीमती पी. व्ही. आंबले यांनी केले आहे.