
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -राजेश गेडाम
भंडारा : जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींनी www.mahaswayam.gov.in.या संकेतस्थळावर अद्याप रोजगार नोंदणी कार्डची नोंदणी केली नाही, किंवा अद्ययावत केले नाही. अशा उमेदवारांनी आधारकार्ड, नावात बदल, पत्ता, मोबाईल नंबर, शैक्षणिक अर्हता याबाबतची माहिती संकेतस्थळावर नमूद करावी, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले आहे.
कसे करावे कार्ड अद्ययावत ?
उमेदवारांनी जुना युजर आयडी रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड टाकून खाते उघडावे. आपला आधार क्रमांक व माहिती अचूक टाकल्यावर सबमिट करा. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून पुन्हा सबमिट करावे. त्यानंतर उमेदवारांनी माहिती भरून पासवर्ड तयार करावा व तो सबमिट करावा. त्यानंतर उमेदवारांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर युजर आयडी व पासवर्ड येईल. त्यानंतर मुख्य पानावर जावून युजर आयडी व पासवर्ड लॉगीन करावे. माहिती भरून प्रिंट काढून ठेवावी. बरेचदा बदललेला मोबाईल नंबर, अर्जित केलेली शैक्षणिक गुणवत्ता अद्ययावत न केल्याने उमेदवारांसाठी योग्य रोजगार संधीची माहिती उपलब्ध करुन देता येत नाही. गुणवत्तेनुसार संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार नोंदणी कार्ड अद्ययावत करणे आवश्यक आहे.