
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
शिऊर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्याची योग्य अमंलबजावणी करण्यासाठी विशेष लक्ष दिले असून मोदी सरकारचे शेतकऱ्याच्या हिताला प्राध्यान्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केले. दि २ जुलै रोजी शिऊर {ता.वैजापूर} येथील श्री संत शंकरस्वामी महाराज मंगल कार्यालयात ग्रीनग्लोब फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर राज्य कार्यकारणी सदस्य एकनाथराव जाधव, माजी महापौर बापू घडामोडे, माजी नगराध्यक्ष, डॉ दिनेश परदेशी, तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, डॉ राजीव डोंगरे, कैलास पवार, गुंजाळ नाना,जिल्हा परिषद सदस्या सपना पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत, संभाजी कलापुरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यमंत्री डॉ भागवत कराड म्हणाले कि, सेवा,सुशासन व गरीब कल्याण हे केंद्रबिंदू ठेवून या माध्यमातून केंद्र सरकारचे काम सुरु आहे, शेतकरी सन्मान योजना, किसान क्रेडिट कार्ड, कोविड काळात भूकबळी होऊ नये या साठी अन्नधान्य, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा आदी योजनांची योग्य अंमलबजावणी सुरु असल्याचे डॉ कराड म्हणाले.
मराठवाड्याचा प्रवेशद्वार वैजापूर साठी वाटर ग्रीड प्रकल्पामुळे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होईल केंद्राच्या माध्यमातून राज्यात रस्त्याचे जाळे तयार होत असून राज्यात देखील सरकार आल्याने खुंटलेला विकास सुरू होईल वैजापूर तालुक्याला चांगले दिवस येतील, वैजापूर तालुका सुजलाम सुफलाम करू असे देखील डॉ कराड म्हणाले.
मुलभूत गरजांसाठी काम करण्याचे प्रयत्न सरकारने केले असून थेट खात्यावर आर्थिक मदत देत भ्रष्टचार थांबून पारदर्शीपणा आणल्याचे भाजपा राज्य कार्यकारणीचे सदस्य एकनाथराव जाधव म्हणाले. वरुणराजाने हुलकावणी दिल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून यातून आधार देण्यासाठी मोफत बियाणे वाटप करण्यात येत असल्याचे जिल्हा सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी म्हणाले.
२८ गावातील ८९८ नोंदणीकृत शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले असून वैजापूर तालुक्यातील ५००० शेतकऱ्यांना बियाणे देण्यात येत असल्याचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी सांगितले.
यावेळी वसंत पवार, शिवाजी साळुंके, उदय सोनवणे, कुमार सुतवणे, सुशील देशमुख, अंकुश वरपे, अमोल जाधव, संदेश जाधव, आदींसह ग्रामस्थ, शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष सुनील पैठणपगारे यांनी तर आभार सरचिटणीस प्रमोद गुळे यांनी मानले.
शंकरस्वामी महाराज समाधीचे दर्शन
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी श्री संत शंकरस्वामी महाराज समाधी मंदिरात येऊन स्वामींच्या समाधीची पूजा करत दर्शन घेतले, संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव यांनी त्यांना मंदिर जीर्णोद्धार बाबत माहिती देत पुढील महिन्यात होणाऱ्या सप्ताहाचे निमंत्रण दिले तर स्वामींचे वंशज बंडोपंत लाखेस्वामी यांनी स्वामींचे जीवन कार्य त्यांना सांगितले.