
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
मुंबई.दि.३. विधानसभा अध्यक्षपदी भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर १६४ मतांसह विजयी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला.यावेळी एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकरांनी आजवर केलेल्या कामांचा दाखला दिला. याच दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी नरहरी झिरवळ यांच्या कामाचं कौतुक केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी “आदिवासी असून देखील नरहरी झिरवळ यांनी चांगलं काम केलं” असं विधान केलं.
जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावरून भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. “सत्ता गेली पण माज जात नाही” असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “आदिवासी असूनही चांगलं काम केलं या विधानाचा अर्थ काय? जातीयवाद यांच्या मनात रुजलेला आहे. मी तमाम दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त बांधवांच्या वतीने या विधानाचा जाहीर निषेध करतो. सत्ता गेली पण माज जात नाही” असं पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बाळासाहेब थोरात यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. यावेळी भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सवाल विचारला आहे. फडणवीसजी तुमचं अभिनंदन कसं करावं?, एका दगडात किती पक्षी मारले? अशी विचारणा केली आहे. तुमची आदित्य ठाकरेंशी जवळीक होती. तुम्ही त्यांना कायदा शिकवला. अजित पवारांनी त्यांच्यासोबत असणारं नातं सांगितलं. पण मग तुम्ही काँग्रेसच का बाजूला ठेवली? असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी विचारला. तसेच अनुभवी सदस्यांना अध्यक्ष बनवण्याची परंपरा आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही एका दगडात किती पक्षी मारले? असा प्रश्नही थोरात यांनी यावेळी विचारला. “राज्याचा कारभार इथे चालतो. गेल्या दोन वर्षात सदस्यांना संधी मिळाली नाही. सभागृहाने अनेक मोठी माणसं पाहिली.”
“एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. आता देवेंद्र फडणवीस तुमचं अभिनंदन कसं करावं असा प्रश्न पडला आहे. छगन भुजबळांनी उल्लेख केलेल्या बुद्धिबळाच्या खेळाकडे तुमचंच लक्ष नव्हतं असं वाटतं आहे” असं बाळासाहेब थोरात म्हणाले. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्याचं हित साधलं जावं ही अपेक्षा असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोबाईलवरील एक मेसेज वाचून दाखवत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला. या टोलेबाजीनंतर सभागृहात एकच हशा पिकला.