
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : विधानसभेत अविश्वास प्रस्ताव मांडताना गटनेत्याचा पक्षादेश (व्हीप) महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. या वेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहणार असून, बंडखोर आमदारांचे मतपरिवर्तन होण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सांगितले.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘विधानसभेच्या अध्यक्षपदी अजूनही नरहरी झिरवळ आहेत. कायद्याने त्यांना अधिकार असल्याने, त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षांची आम्ही बैठक घेऊन, एकत्रित अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार आहोत. पक्ष म्हणून विधानसभेतील व्हिप आणि संघटनात्मक काम या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे गटनेत्याने दिलेला व्हीप आमदारांना पाळावाच लागणार आहे.
प्रस्तावाच्या वेळी अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात असल्याने न्यायालयाच्या निर्णयावरही ही प्रक्रिया अवलंबून आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची इतके दिवस ‘विशेष काळजी’ घेण्यात आली. मात्र, सभागृहात आल्यानंतर हे ‘विचारवंत’ (बंडखोर आमदार) काय करणार आहेत, याकडे लक्ष राहणार आहे. सभागृहात आल्यानंतर या आमदारांच्या मतप्रवाहात बदल झालेला दिसेल, असेही पवार म्हणाले.