
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : उच्चशिक्षित आणि कायद्याचे ज्ञान असलेला विधिमंडळातील सदस्य आज अध्यक्षपदी बसला आहे. सभागृहात योग्य वर्तन पाळण्याची गरज आहे. जागा सोडणे, इतरांच्या भाषणात अडथळा निर्माण करणे, अशा अनेक गोष्टीमुळे सभागृहाचे नियम मोडले जातात. सभागृहाचे आदर्श पाळण्यासाठी राहूल नार्वेकर आग्रही राहतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी जयंत पाटील यांनी वयाच्या 27 व्या वर्षांच्या आपल्या विधिमंडळाच्या पहिल्या प्रवासाची आठवण काढून त्यावेळी पाळण्यात येणाऱ्या नियमांचे उदाहरण दिले. विधानसभेतील हिरव्या कार्पेटवर आपण पाऊल टाकून आत आल्यावर सर्वांनी काही मर्यादा पाळायला हवी, काही साधनशुचिता बाळगायला हवी, असे जयंत पाटील म्हणाले.
एखादा सदस्य भाषण करत असताना त्याचे भाषण पूर्ण करण्याची संधी द्यावी. त्यानंतर आपण सदस्याला उत्तर द्यावे, अशी व्यवस्था करण्याचा राहूल नार्वेकर प्रयत्न करतील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
राहूल नार्वेकर अडीच वर्षाच्या कार्यकाळात आम्हाला तसेच विधानसभेतील सर्व सदस्यांना नक्कीच न्याय देतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.