
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरू असताना एकेक आमदारांचे मत बहुमोल असताना नांदेडमधील देगलूरचे आमदार मात्र बोहल्यावर चढले आहेत. रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवड सुरू असताना काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला.
देगलूरचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्वत:च्या लग्नातील विधी टाळून राजधानीत दाखल झाले होते. आमदार अंतापूरकर हे मुंबईवरून नांदेडला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी येत असताना त्यांना त्याचवेळी विधीमंडळ सचिवालयातून गुरुवारी होणा-या बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी फोन आला होता. त्यामुळे लग्नघटिका समीप येत असतानासुद्धा लग्न कार्याच्या विधीस फाटा देत आधी लगीन कोंढण्याचे म्हणत आमदार जितेश अंतापूरकर मुंबईत उपस्थित होते. आता मात्र त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवेळी हजेरी न लावता बोहल्यावर चढण्याला प्राधान्य दिले.