दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -अनिल पाटणकर
अडवली,ता.वेल्हे :- ग्रामीण भागातील नागरिकांचे अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे नेहमीच आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आपण नेहमीच पाहत असतो आणि त्यामुळेच त्यांना मोठमोठ्या शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते त्याबद्दल सामाजिक बांधिलकी जपत शिवार फाऊंडेशन आणि विमल नर्सिंग होम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच वेल्हे तालुक्यातील अडवली या गावामध्ये मोफत रोग निदान आणि आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वेल्हे पोलीस दलातील अडवल साहेब ,डॉ.गजानन शिंदे, डॉ.पल्लवी शिंदे तसेच मनसे वेल्हे तालुकाप्रमुख दिगंबर चोरघे यांच्या हस्ते करणेत आले. या शिबिरामध्ये अडवलीसह पंचक्रोशी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उत्फुर्तपणे सहभागी झाले होते. शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकांची रक्तदाब,साखर ,ई सी जी तपासणीसह संपूर्ण आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली. शिवाय त्यातील गरजवंतांना योग्य तो आरोग्य विषयक सल्ला देण्यात आला.
या कार्यक्रमास शिवार फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाळनाना इंगुळकर,पौर्णिमा निकम, वि.न.मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलचे डॉ.गौरव पवळे, पोलीस कर्मचारी जाधव साहेब, ग्रा.प.मार्गासनी चे मा.सरपंच अनंता उफाळे, उपसरपंच संभाजी इंगुळकर,सदस्या हर्षदा उमेश दिक्षीत,दशरथ काटकर,माऊली काटकर, राजू रणखांबे हे उपस्थित होते.