दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडतीची सभा पुढील आठवड्यात बुधवारी (दि.१३ जुलै) होणार आहे असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जाहीर केले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम,१९६१ व जि.प. आणि पं.स. (जागांची आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम १९९६ नुसार जिल्हा परिषद व त्या त्या पंचायत समिती क्षेत्रात सभा होणार आहे.सभेद्वारे अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती (महिला आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यात येणार आहे.त्यासाठी सोडत काढणे व आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना सादर करणे यासाठी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
त्यानुसार जिल्हा परिषद निवडणूक आरक्षणाबाबत सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात दि.१३ जुलै रोजी सकाळी ११:०० वा. होईल.त्याचप्रमाणे,चिखलदरा,चांदूर बाजार,मोर्शी,वरूड,अमरावती,अचलपूर,धारणी,अंजनगाव सुर्जी,दर्यापूर,भातकुली,नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समित्यांच्या निवडणूक आरक्षण सोडतीची सभा त्या त्या संबंधित तहसील कार्यालयात दि.१३ जुलै रोजी सकाळी ११:०० वा. होईल.
आरक्षणाचे प्रारूप दि.१५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी,तसेच संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना दि.१५ ते २१ जुलै दरम्यान कार्यालयीन वेळेत सादर करता येतील.जि.प. व पं.स. समितीतील ज्या नागरिकांची सभेस हजर राहण्याची इच्छा असेल त्यांनी संबंधित ठिकाणी हजर राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांनी केले आहे.