दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
गेवराई प्रतिनिधी
आर. के. पब्लिक स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त भव्य वारीचे आयोजन
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज व महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालख्या आळंदी देहू पासून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पंढरपूरला जातात. पंढरीची वारी ही परंपरा महाराष्ट्राची संस्कृती आहे , याचे दर्शन सर्व विद्यार्थ्यांना व्हावे तसेच प्रत्यक्ष वारीचा अनुभव यावा याकरिता आर. के. पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या वतीने भव्य दिंडीचे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. योगिता चाळक, संस्थापक सचिव आर. के. चाळक , गणेश चाळक, सुप्रिया जाधव, रहीम शेख आदींची उपस्थिती होती.
यामध्ये मुले व मुली संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, जनाबाई, नामदेव, सोपानदेव यांची वेशभुषा करुन सहभागी झाले होते. विठुरायाचा व ग्यानबा तुकारामाचा गजर करत पालखी काढण्यात आली होती. शाळेच्या भव्य परिसरात पालखीचे स्वागत व पूजन केले. विठुरायाच्या गजराने संपूर्ण आर. के. पब्लिक स्कूल चा परिसर विठुरायाच्या नामाने दुमदुमून निघाला. शालेतील विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी, वारीचा हा वसा पिढ्यांपिढ्या चालत राहावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते अशी माहिती प्राचार्य गणेश चाळक यांनी दिली. या कार्यक्रमात प्ले ग्रुप पासून दहावी पर्यंत सर्व विध्यार्थी सहभागी झालेत. टाळ चिपळ्याचा नाद, मृदुंगाची साद, पालखी, रिंगण फुगड्या अशा प्रसन्न वातावरणात सारा परिसर विठुमय झाला. या कार्यक्रमासाठी शिक्षक, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.