दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी:-माधव गोटमवाड
नांदेड:-
मौजे कंधारेवाडी ता.कंधार येथील असणारे बापूराव गोटमवाड लहानपणापासून अतिशय कष्टकरी, मेहनती ,इनामदार, प्रेमळ, माणुसकीचा मुर्तीमंत झरा आहेत . त्यांनी याच मेहनत व प्रामाणिक पणामुळे ते आज कौटुंबिक स्तरावर अतिशय उज्वल, सुखी ,समाधानी आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत.
ते सध्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन पदावर कार्यरत आहेत. अधिकारी बापुराव गोटमवाड हे दररोजच्या प्रमाणे सोमवार दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता कार्यालयातील दैनंदिन प्रशासकिय कामकाज आटोपून घराकडे निघाले असताना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर त्यांना एक किमती मोबाईल सापडला.त्यावेळी कुठल्याही प्रकारच्या मोहाला बळी न पडता सहाय्यक प्रशासन अधिकारी बापुराव गोटमवाड साहेब यांनी आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार हा मोबाईल संबंधित व्यक्तीकडे परत करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या परिचित असलेले पोलीस उपनिरीक्षक घुगे साहेब यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून त्यांना त्याविषयीची माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात जावून तेथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने मोबाईल मालकाचा शोध घेतला असता श्रीपादनगर, कौठा येथील रहिवाशी ज्येष्ठ महिला विमल वानखेडे यांचा तो असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विमलबाईच्या पुतण्यास नरेंद्र व्यंकटराव वानखेडे यास बोलवून घेऊन रात्री ८ वा. पोलिसांसमक्ष मोबाईल त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. अशा प्रकारे पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल एका तासाच्या आत महिलेच्या भावाकडे पि.एस.आय घुगे व त्यांच्या सहकारी यांच्या समक्ष सुपूर्द करण्यात आला. सद्याच्या संगणक, धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात माणुसकी व प्रामाणिक पणा लोप पावत असल्याची सगळीकडे ओरड होत असतानाच सहाय्यक प्रशासन अधिकारी बापुराव गोटमवाड यांनी दाखविलेल्या अशा माणुसकी व प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.