दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- मन्मथ भुस्से
पुणे:- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक विनायक विश्वनाथ कानेटकर (वय ८३ वर्षे) यांचे सोमवार (१८ जुलै) रोजी सकाळी पुण्यातील कौशिक आश्रम येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
विनायकराव कानेटकर यांचा जन्म ५ सप्टेंबर १९३९ रोजी झाला होता. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्रात एम.ए. केले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता म्हणून १९६१ ते १९६३ असे काम केल्यानंतर ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले. आधी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर व पन्हाळामध्ये काम केल्यानंतर १९६५ सालापासून ते आसाममध्ये प्रचारक म्हणून गेले. यात त्यांनी कामरूप जिल्हा, गोहाटी नगर, तेजपुर विभाग इ. ठिकाणी कार्य केले.
कानेटकर यांनी १९८४ पासून १२ वर्षे आसामचे प्रांत सह बौद्धिक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर ते १९९६ ते २००३ इतिहास संकलन योजनामध्ये त्यांनी कार्य केले. तसेच २००३ ते २००७ भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय सह संघटन मंत्री आणि २००७ ते २०१६ अ. भा. संघटन मंत्री या नात्याने त्यांनी काम केले. पाच दशकांहून अधिक काळ संघकार्य केल्यानंतर विनायक कानेटकर हे २०१६ मध्ये सर्व दायित्वापासून मुक्त झाले होते. सध्या ते कौशिक आश्रम येथे निवासास होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली…!