
दै,चालू वार्ता
मोलगी प्रतिनिधी रविंद्र पाडवी
सहा दिवसात वीज वितरणच्या अक्कलकुवा कार्यालयात घेराव आंदोलन
मोलगी : वीजबिल वसुलीच्या नावाखाली अक्कलकुवा तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणात मोठी अडचण निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर शेतातील पिके देखील संकटात सापडले आहे. या समस्येविरुद्ध भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील जनता दि. 1 नोव्हेंबर रोजी वीज वितरणच्या अक्कलकुवा कार्यालयात घेराव आंदोलन करणार आहे.
नागरिकांच्या सेवेसाठी शासकीय यंत्रणेमार्फत वीज पुरवठा केली जात असली तरी याच्या नावाने नागरिकांना अडचणी आणले जात आहे. याचा अनुभव अक्कलकुवा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकर्यांना नेहमीच येत आहे. विजेच्या या संकटातून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी देखील सुटले नाही. विज पुरवठा करतांना अक्कलकुव्यातील वीज वितरणचे कर्मचारी नेहमीच मनमानी कारभार करतात. वसुलीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडीत करीत नागरिकांना अडचणीत आणत आहे.
कोरोनाच्या संकटाने विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण केले, त्यांच्यावर ऑनलाइन शिक्षण लादले गेले. परंतु त्यातही वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे तेही संकटात सापडले आहे. वीज वितरणच्या या भूमिकेमुळे सर्वच घटक प्रभावित झाले. ही बाब संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी अक्कलकुवा कार्यालय येथे घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपाचे अ.ज. सेलचे राज्य उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना कळविले.
◾पिकांवर वीजसंकट-
खरीप हंगाम पावसाळ्यावर अवलंबून असला तरी बऱ्याच वेळा लहरी पावसामुळे वीजेचाही आधार घ्यावा लागतो, हिच परिस्थिती अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांवर ओढवली. परंतु पिक कापणीची कामे सुरू झाली असतानाही वारंवार वीज पुरवठा खंडीत करण्यात आली. दुसर्या बाजूने रब्बी हंगामाची शेती कामे सुरू झाली. या कामांसाठीही निव्वळ कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अडचणी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे सुविधा असूनही संकटे शेतकर्यांची पाठ सोडत नसल्याचे म्हटले जात आहे.
◾डिजिटल इंडिया ठरते खोटी-
मोलगी ता. अक्कलकुवा भागातील नागरिकांना भ्रमणध्वनीची सेवा देणाऱ्या कंपन्यांचे सर्वच टावर अपेक्षित विज पुरवठा केला जात नसल्याने बंद पडतात. त्यामुळे आधुनिकीकरणातील कुठलीच ऑनलाइन कामे मार्गी लावता येत नाही. शासनामार्फत ऑनलाइन सेवेला प्राधान्य दिले जात असले तरी मोलगी भागात ही कामे होत नसल्याने या भागापुरती का असेना डिजिटल इंडिया ही बाब खोटी ठरत आहे.
◾प्रतिक्रिया
वेगळी ओळख असलेल्या सातपुड्यात अनेक प्रकारच्या समस्या आहे, त्यात विजेच्या समस्या आघाडीवर आहे. या समस्यांपैकी बहुतांश समस्या मानवनिर्मित असल्याचे दिसून येतात. भांगरापाणी फेज अंतर्गत भांगरापाणीसह काठी, जामली, उमटी या भागात नेहमीच या वीज पुरवठा खंडित केली जाते. त्यामुळे या भागातील नागरीक अनेक समस्यांना तोंड देत आहे.
-कालुसिंग पाडवी, मु. पाडली ता़.धडगाव