दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : नुपूर शर्मा यांना मोठा दिलासा देत न्यायालयाने म्हटले आहे की, सध्या कोणत्याही राज्यातील पोलिसांनी त्यांना अटक करू नये. पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार आहे. हा आदेश सुनावताना खंडपीठाने त्यांच्या हत्येबाबत बनवण्यात आलेल्या व्हायरल व्हिडीओची दखल घेतली आहे. उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने याचिकाकर्त्याचा शिरच्छेद करण्याची धमकीही दिल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. नुपूर शर्मा यांच्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
कालच्या सुनावणीदरम्यान नुपूर शर्मांची बाजू मांडणारे वकील मनिंदर सिंह न्यायालयात म्हणाले की, ”त्यांच्या (नुपूर शर्मा) जीवाला धोका आहे.” मनिंदर सिंह म्हणाले की, अनेक नवीन घटना घडल्या आहेत. पाकिस्तानातून कोणीतरी येण्याची शक्यता आहे. पाटण्यात काही लोक पकडण्यात आले आहे. हे लोक नुपूर यांना मारण्याचा कट रचत होते. प्रत्येक राज्याच्या न्यायालयात जाणे मला शक्य होणार नाही, असं ते म्हणाले.