
दै चालु वार्ता वृत्तसेवा
सोलापूर : खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी कंबर कसली,राज्यातला मराठा आरक्षणाचा प्रश्न काही दिवस मागे पडला असला तरी आता तो पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लाँग मार्च काढण्याची घोषणाही संभाजीराजेंनी केली आहे.
छत्रपती संभाजीराजे आज जनसंवाद यात्रेनिमित्त सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी मोहोळमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी पुणे ते मुंबई लाँग मार्च काढणार असल्याचे सांगितल. ते म्हणाले, “लाँग मार्चची घोषणा केली असली तरी लाँग मार्च व्हावा अशी आमची इच्छा नाही. गेल्या सात- आठ महिन्यात आम्ही अनेकदा राज्य शासनासमोर आम्ही अनेक प्रश्न मांडले आहेत. आरक्षणाच्या बाबतीत असो किंवा इतर बाबतीत राज्याने व केंद्राने आपापली जबाबदारी पार पाडायला हवी”.
संभाजीराजे पुढे म्हणाले, “आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या मूलभूत सुविधा आहेत, त्याबद्दल आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, मूक आंदोलन केलं. त्यातूनही काही निष्पन्न होत नाही. परवा त्यांनी आम्हाला एक पत्रही पाठवलं पण ते बोगस होतं. बोगस म्हणणं चुकीचं आहे. ते पत्र चुकीचं होतं कारण ते सरकारी बाबूंनी लिहिलेलं पत्र होतं. मी त्यांच्या पत्राला उत्तर दिलं की तुम्हाला चुकीचं कोणीतरी सांगितलं आहे. पण त्याला त्यांचं काही उत्तर आलेलं नाही. अशीच परिस्थिती असेल, गरीब मराठ्यांचं नुकसान होत असेल तर आम्हाला लाँग मार्च काढण्यावाचून पर्याय उरणार नाही”. असेही यावेळी संभाजीराजेम्हणाले