
दै चालु वार्ता वृत्तसेवा
बिलोली : देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. २६) चिटमोगरा (ता. बिलोली) येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. थोरात म्हणाले, भाजप नेते शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करतात आणि शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालतात. दिल्लीच्या सीमेवर नऊ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनातील काही शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागले. त्यामुळे आता भाजपला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे सरकार असताना पेट्रोलचे भाव पन्नास पैसे किंवा एक रुपयाने वाढले तर भाजपचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होते. आता केंद्रात भाजपची सत्ता असताना इंधनाचे भाव गगनाला भिडले असून महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहे.अशा महागाईत मते मागण्याचा भाजपला अधिकार नसल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी
माजी मंत्री रमेश बागवे तसेच दिलीप पाटील बेटमोगरेकर, डॉ. मीनलताई खतगावकर, अनिरुद्ध बनकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सतीश पाटील चिटमोगरेकर यांनी प्रास्ताविक केले.