
दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : राहुल गांधी म्हणाले की, “पेगाससद्वारे भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे म्हटले आहे. हे मोठे पाऊल आहे. मला विश्वास आहे की यातून सत्य बाहेर येईल.”
“संसदेच्या अधिवेशनात आम्ही पेगाससचा मुद्दा उपस्थित केला होता. आज आम्ही जे म्हणत होतो त्याचे न्यायालयाने समर्थन केले आहे. आम्ही ३ प्रश्न विचारत होतो, पेगाससला कोणी अधिकृत केले?, ते कोणाच्या विरोधात वापरले गेले आणि इतर देशांना आपल्या लोकांची माहिती मिळाली का?, मात्र यावर आम्हाला उत्तर मिळाले नाही.”,असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल पुढे म्हणाले की, “पेगाससचा वापर मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, भाजपा मंत्र्यांसह इतरांविरोधात केला गेला. पंतप्रधान आणि गृहमंत्री पेगासस वापरून डेटा मिळवत होते का? निवडणूक आयोग, सीईसी आणि विरोधी पक्षनेत्यांच्या फोन टॅपिंगचा डेटा पंतप्रधानांकडे जात असेल तर ते गुन्हेगारी कृत्य आहे.” इस्राईलच्या एनएसओ कंपनीच्या पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करून भारतात अनेकांवर हेरगिरी केल्याच्या आरोपांवरील याचिकांची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय घेतला.यामुळे आता या प्रकरणातील नेमकं सत्य बाहेर येणार आहे. या निर्णयानुसार पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची विशेष समिती गठीत करण्यात येणार आहे. हीच समिती या प्रकरणाचं सत्य समोर आणेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पेगासस हेरगिरी प्रकरणावरून राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या मुद्द्यावरून आवाज उठवणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.