
दैनिक चालू वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
लातूर – व्यवहारात सुसूत्रता यावी यासाठी आर बी आय वेळोवेळी विविध किमतींची नाणी चलनात आणत असते. मात्र गेल्या 3 वर्षांपासून अफवेतून पसरलेला गैरसमज आणि संभ्रम यामुळे 10 रुपयांची नाणी कुणीही स्वीकारत नसल्याने आपोआपच ही नाणी चलनातून गायब झाल्या आहेत.
प्रशासनाने आणि आर बी आयने यासंबंधी निवेदन काढून 10 रुपयांची सर्व नाणी स्वीकारावीत असे आवाहन करूनही याचा कसलाच उपयोग झाला नाही. चलनात असणारी 10 रुपयांची नाणी न स्वीकारणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचा दम देखील प्रशासनाने दिलेला आहे. मात्र अद्याप या नाण्याबद्यल लातूर मध्ये असलेली ऍलर्जी गेलेली नाही. चलनात असलेली नाणी न स्वीकारणे हे कायद्याने गुन्हा आहे. पण हा गुन्हा सर्वचजण नकळत करीत आहेत. जोपर्यंत नाणी न स्वीकारण्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत ही नाणी पुन्हा चलनात येणार नाहीत यात शंका नाही.
अफवा, संभ्रम आणि गैरसमज यामुळे चलनात असलेली शासकीय नाणी चलनातून गायब होण्याचा अनोखा आणि नकोसा विक्रम आपण आपल्या नावे केलेला आहे. या गंभीर आणि आश्चर्यकारक घटनेला आता प्रशासनाने गांभीर्याने घेतले पाहिजे आणि 10 रुपयांची नाणी पुन्हा चलनात यावी यासाठी प्रयत्न करावेत. सर्वसामान्य जनतेच्या दळणवळणास चालना देणारी ही नाणी सर्वांनी वापरात आणावी आणि व्यापार्यांनीही ती बिनदिक्कतपणे स्वीकारावीत हीच भावना.