
दै चालु वार्ता
दैनिक चालू वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
लातूर : राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्या पद्धतीने साखर कारखान्यात घोटाळे केले आहेत. त्याच पद्धतीने लातूर जिल्ह्यात देशमुख परिवाराने देखील कारखान्यात घोटाळे केले आहेत. एक-एक माहिती समोर येत आहे. यात प्रियदर्शनी व बालाघाट कारखान्याची तर ईडीने चौकशी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २०१९ मध्येच दिले आहेत. ठाकरे सरकारने त्यांना क्लिनचीट दिली असली तर ईडीची चौकशी सुरु आहे. देशमुख परिवाराने सहा कारखाने गिळंकृत केले असून याची सर्व माहिती काढून ता.३१ डिसेंबरपर्यंत याची चौकशी सुरु होईल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी बुधवारी (ता.२७) येथे पत्रकार परिषदेत दिली. आता लातूर दिवाळीनंतर नांदेड असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे तसेच साखर कारखान्याचे घोटाळे बाहेर काढले (Latur) जात आहेत.
आतापर्यंत २३ घोटाळे बाहेर काढले असून ४० पर्यंत ही संख्या जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या माध्यमातून मोठा घोटाळा केला. देशातील सर्वात मोठा अकरा दिवस प्राप्तीकर खात्याचा छापा त्यांच्यावर पडला. यातून बरीच माहिती पुढे येत आहे. या संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार बनवाबनवी करीत आहेत. ठाकरे सरकार हे माफियांचे सरकार आहे. राज्यातील घोटाळ्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी नवाब मलिक एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर व्यक्तिगत टीका करीत असून हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही, असे श्री. सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मला ६४ पानांचे पत्र पाठवले आहे. बायकोने कधी एवढे कौतूक केले नसेल एवढे कौतूक त्यांनी या पत्रात माझे केले आहे. यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संदर्भात चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. पण या पत्रात इतर व्यक्तींच्या पत्राशिवाय दुसरे काहीच नाही. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र दिले आहे. पण या प्रकरणात श्री. ठाकरे व श्री. शिंदे यांनी देखील त्यांच्या पत्राला कवडीमोल किंमत दिली नाही, अशी माहितीही श्री. सोमय्या यांनी यावेळी दिली.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माफिया लोक जसे काबिज करतात तसे काम येथे झाले आहे. राज्यातील इतर साखर कारखान्यासारखेच या जिल्ह्यात देखील कारखान्यात घोटाळे झाले आहेत. यात प्रियदर्शनी व बालाघाट कारखान्यात तर उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. देशमुख परिवाराने सहा कारखाने गिळंकृत केले आहेत. सहकारी साखर कारखाने खासगी करण्याचा घाट घातला जात आहे. सर्व माहिती घेतली जात आहे. डिसेंबरपर्यंत याची चौकशी सुरु झाली असेल याची खात्री बाळगावी, अशी माहिती श्री. सोमय्या यांनी दिली. यावेळी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील यांनी जिल्ह्यातील बालाघाट व प्रियदर्शनी कारखाना, जागृती शुगरने साडेअकरा हजार शेतकऱ्यांची केलेली फसवणूक, जिल्हा बँकेने अनेक संस्थांना कर्ज पुरवठा केला आहे. त्याची चौकशी करावी याची कागदपत्रे श्री. सोमय्या यांना सुपूर्द केली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार आदी उपस्थित होते.