
दै चालु वार्ता
दरवर्षी २९ आँक्टोबर हा दिवस जागतिक पक्षघात (पाँरेलिसिस) त्या निमित्ताने
युनायटेड सिग्मा हाँस्पिटल चे न्युरो फिजिशियन डाँ आनंद सोनि यांचा लेख
बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये वाढतोय पॅरालिसीसचा धोका
एका जागी बसून काम, अवेळी जेवणे, झोपणे, उच्च कोलेस्ट्रॉल युक्त जेवण, व्यायामाचा अभाव यासोबतच ताण तणावाने तरुण वयातच मेंदूला कमी रक्त पुरवठा होण्याचा (पॅरालिसीस) धोका मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेला आहे. सध्या साधारणतः शंभर रुग्णांमागे ४० वयोगटातील जवळपास वीस ते तीस टक्के तरुणांना या आजाराला सामोरे जावे लागत आहे, अशी माहिती न्यूरोफिजिशियन डॉ. आनंद सोनी यांनी दिली आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे कामाच्या पद्धती देखील बदललेल्या आहेत. यामुळे बाहेरचे खाणे होत आहे. फास्ट फूड आणि उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या जेवणामुळे आपल्या शरीरावर याचा विपरीत परिणाम होऊ लागलेला आहे. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी गेला आहे. यामध्ये मद्यपान , धूम्रपान, तंबाखू, गुटखा खाणे यामुळे देखील गेल्या काही वर्षात पॅरलिसीस चे तरुण रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. यात ३८ ते ४० अशा कमी वयात तरुणांना हा आजार होत आहे. यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. नाहीतर पुढे याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अनेक जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब असतो. मात्र, असे नागरिक नियमितपणे तपासणी करत नाहीत. तसेच अनेक जण गोळ्या देखील घेत नाही. त्यामुळे अशा लोकांना मोठ्या प्रमाणात मेंदूत रक्तस्त्राव सारख्या आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे वयाच्या चाळिशीनंतर दर सहा महिन्यांनी आपल्या तपासण्या करणे या आवश्यक बनले आहे. यासोबतच उच्च कोलेस्ट्रॉल असलेले जेवण, फास्ट फूडचे अधिक प्रमाणात सेवन करू नये. नाहीतर याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. हा आजार टाळायचा असेल तर आपण नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे. दररोज व्यायाम किंवा २० मिनिटे पायी चालणे स्वास्थ्यासाठी चांगला आहे .
अनेकदा पॅरलिसीस झालेला रुग्ण रुग्णालयात आल्यावर मेंदूचा सिटी स्कॅन करणे हे अतिशय आवश्यक असते. त्यानंतरच मेंदूचा झटका हा कुठल्या प्रकारचा आहे, हे कळते. त्यानंतर त्यावर योग्य उपचार करता येतात, असे देखील डॉ. सोनी यांनी सांगितले.
पॅरलिसीसमध्ये तीन प्रकारचे रुग्ण आढळतात. यात सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाचे लक्षणे असलेले रुग्ण असतात. यातील सौम्य लक्षणे असलेले रुग्ण हे ९० ते ९९% बरे होतात. मध्यम लक्षण असलेले ७० ते ८० टक्के बरे होतात आणि तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना आयसीयूमध्ये उपचार घ्यावे लागतात. या रुग्णांना बरे होण्यास थोडा वेळ लागतो. दरम्यान,ज्यांना पॅरलिसीस झाला आहे, असे रुग्ण सकारात्मक विचार फिजिओथेरपी घेऊन बरे होऊ शकतात. दरम्यान, रक्तदाबाच्या गोळ्या घेतल्याने किडनीवर परिणाम होतो हा गैरसमज मनातून काढून टाकावा आणि या आजाराचा धोका टाळावा, असेही ते म्हणाले.
लक्षणे १. चेहऱ्याचा एक भाग वाकडा होणे
२. हाता पायाला मुंग्या येणे
३. हाता- पायाची ताकद कमी होणे
४. बोलण्यात अडखळणे
५. चक्कर येऊन तोल जाणे
६. काही जणांच्या नजरेत बदल
काय काळजी घ्यावी
१. उच्च कोलेस्ट्रॉल असलेले अन्न घेणे टाळावे
२. नॉनव्हेज चे प्रमाणही कमी ठेवावे.
३. शक्यतो सात्विक अन्न घ्यावे.
४. दररोज काम २० मिनिटे पायी चालावे.
कशामुळे होतो
साठ वर्षानंतर आपल्या रक्तवाहिन्याचा लवचिक पण कमी होत. त्यामुळे त्यामध्ये कोलेस्टेरॉलचा थर जमा होतो. अनेकांना उच्चरक्तदाब, मधुमेह असतो. मात्र, असे असून देखील ते नियमितपणे तपासणी करत नाहीत. त्यामुळे अशांना धोका अधिक असतो. मात्र, सध्याच्या जमान्यामध्ये चाळिशीच्या आतच तरुणांना या आजाराचा धोका निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली, ताण-तणाव यासोबतच तंबाखूचे सेवन आणि इतर व्यसन करणे होय.
चाळीशीनंतर नियमित तपासणी करावी
सध्याच्या तरुणांमध्ये व्यायामाचा खूप आभाव आहे. बुद्धीचे काम आधिक आहे. मात्र त्या तुलनेत शारीरिक हालचाल नाही. तसेच तणाव देखील मोठ्या प्रमाणात आहे. जीवनशैली बदलल्याने चाळिशीतच पॅरॅलिसिस या आजाराचा धोका निर्माण झाला आहे. चाळिशीनंतर नियमित तपासणी करावी. प्रकृतीप्रमाणे तरुणांमध्ये या आजाराचा धोका वाढला आहे.
डॉ. आनंद सोनी, न्यूरो फिजिशियन युनायटेड सिग्मा हाँस्पिटल औरंगाबाद
दै चालु वार्ता प्रतिनिधी
औरंगाबाद मोहन आखाडे