
दैनिक चालू वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
औरंगाबाद : सर्वसामान्यांची लालपरी म्हणून ओळख मिरवणारी एसटी बस सेवा. सामान्य माणसाच्या खिशाला एसटीचा प्रवास परवडतो. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे हजारो प्रवासी स्थानकावरच खोळंबले. अनिश्चित वेतन, कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, प्रलंबित महागाई भत्ता, राज्य शासनात विलीनीकरण अशा अनेक मागण्यांसाठी बुधवारपासून एसटी महामंडळाच्या कामगार संघटनांनी बेमुदत उपोषण राज्यभरात सुरू केले आहे. आज औरंगाबाद विभागातून कुठल्याही मार्गावर बस धावणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम दिवाळीपूर्वी देण्यासंदर्भात एसटी प्रशासनाकडे एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने मागणी करण्यात आली होती. मात्र संघटनेकडून करण्यात आलेल्या कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्याने राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून उपोषण सुरू केले. पहिल्या दिवशी उपोषणाचा प्रवासी सेवेवर परिणाम झाला नाही. मात्र गुरुवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी एसटी सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी जमले होते. मात्र नगर-पुणे जाणाऱ्या तीन बस सोडून इतर सर्व बस फलाटावर लावण्यात आल्या. त्या त्या भागातील डेपो चालक, वाहकांना आपल्या शहरात परतण्यासाठी या तीन बस सोडण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. याव्यतिरिक्त औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व बस स्थानकावर लावण्यात आल्या असून आज कुठल्याही मार्गावर बस धावणार नसल्याचे संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र या सर्वांमध्ये खाजगी एजंटांचा मोठा सुळसुळाट पाहायला मिळाला. बस बंद झाल्याने प्रवासी आपल्याकडे खेचण्यासाठी फलाटावरच खाजगी चालकांमध्ये स्पर्धा लागली होती.