
मोखाड्यातील सोनोग्राफी मशीनचा प्रश्न चिघळला संतप्त महीला ग्रामीण रुग्णालयात दाखल
दैनिक चालू वार्ता
पालघर
प्रतिनिधी:-अनंता टोपले
मोखाडा- मोखाडा ग्रामीण रूग्णालयातील सोनोग्राफी मशीनचा प्रश्न चिघळला असून संतप्त महिला ,दि २९ आक्टोबर वार शुक्रवार रोजी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल झाल्या आहेत.यावेळी रूग्ण कल्याण समिती सदस्य माधुरी मुकणे महिलांसमवेत ग्रामीण रूग्णालयात उपस्थित होत्या.पोटीची खळगी जेमतेम भरणा-या अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील गोरगरीब आदिवासी जनतेला सोनोग्राफीसाठी पदरमोड करून शहरात जाऊन खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी करायला परवडत नाही म्हणून आरोहन या एनजीओने सिमेन्स कंपनीच्या माध्यमातून ऑगस्ट २०१८ साली सोनोग्राफी मशीन ग्रामीण रुग्णालयात तत्कालीन आरोग्य मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत उपलब्ध करून दिली.मात्र मशीन चालवणा-या ऑपरेटरला मानधन देण्यासाठी जुलै २०२१ पासून मानधन निधी उपलब्ध नसल्याने ऑपरेटरविना सोनोग्राफी मशीन बंद आहे.मात्र रूग्णालयात महिला ठरलेल्या दिवशी तपासणीसाठी गेल्या असता मशीन बंद आहे असे खोटे सांगून रूग्णालयातून परत पाठविण्यात येते.त्यामुळे आदिवासी जनतेला विशेषत: गरोदर महीलांना याचा प्रचंड त्रास होत आहे.२५ ते ३० किलोमीटर अंतरावरून तालुक्याच्या ठिकाणी सोनोग्राफी करण्यासाठी येणा-या गरोदर महीलांची हेळसांड होत आहे.मुळ मुद्दा असा आहे की तपासणीसाठी भाडे देऊन तालुक्याच्या ठिकाणी यायला पुरेसा पैसा नसणारा हा गरीब आदिवासी शहरात जाऊन भरमसाठ फी देऊन तपासणी कसा करणार ?यावर लवकरात लवकर तोडगा काढावा नाही तर तीव्र आंदोलन छेडू असे महिला यावेळी म्हणाल्या.
कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसणा-या या महीलांनी वैद्यकीय अधिकारी डॉ महेश पाटील यांना दुरध्वनीवरून संपर्क साधला असता मी उद्या सांगेन की ऑपरेटर केव्हा मिळेल ते.असे सांगून रूग्णालयातील डॉक्टरांनी वेळ मारून नेली असेल तरी या महीला आता शांत बसणार नसून त्या आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याच्या विचारात आहे.तेव्हा प्रशासनाने ही अडचण सोडवून आदिवासींची हेळसांड थांबवावी.