
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदीप मोरे
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाने वेग घेतला असून अधिकाधिक नागरीकांचे लसीकरण होण्यासाठी येत्या 2 व 3 नोव्हेंबर रोजी विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेत जिल्ह्यातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधींसह, सरपंच आणि ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदवावा व जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दुकाने, बाजारपेठा, चित्रपटगृहे सुरु करण्यात आली असून आगामी सण उत्सवांच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावापासून स्वत:चा बचाव करणे गरजचे झाले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांने लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील 14 लाख 93 हजार 720 लोकांना कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी 7 लाख 25 हजार 414 नागरिकांनी (48.56 टक्के) लसीचा पहिला डोस घेतला आहे तर 3 लाख 44 हजार 511 नागरिकांनी (23.06) दोन्ही डोस घेतले आहेत. एकूण उद्दीष्टाच्या (71.62 टक्के) 10 लाख 69 हजार 925 लाभार्थ्यांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे. लसीकरण प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनामार्फत ‘मिशन युवा स्वस्थ्य’ अभियान 2 नोव्हेंबर पर्यंत राबविण्यात येत असून महाविद्यालयातील 18 वर्षावरील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक, आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड-19 चे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे.
अद्यापही लसीकरणाचा मोठा टप्पा जिल्ह्याला पार पाडायचा असल्याने या विशेष मोहिमेच्या माध्यमातून सर्वांनी आपले घर, कुटुंब, परिसर, गाव, शहरीभागात लसीकरण करण्यात येणार आहे याचा जिल्ह्यातील नागरीकांनी लाभ घेऊन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन ॲड. पाडवी यांनी केले आहे.