
सन २०२० खरीप हंगामात अतीवृष्टीने नुकसान झालेल्या सर्व पिकांचा पीक विमा तात्काळ वाटप झाला पाहीजे, दिनांक १७ ऑगस्ट २०२० च्या केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे खरीप हंगाम २०२१ च्या अतिवृष्टी बाधीत सर्व पिकांचा पीक विमा मंजुर करावा, शेतकऱ्यांचा उस शिल्लक राहणार नाही याची काळजी घेउन जिल्हयातील सर्व साखर कारखाने पुर्ण क्षमतेने चालु करा व वेळेत एफआरपी प्रमाणे उसाचे पैसे मिळण्याची सोय करा. या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेनी सिरसाळा ते बीड पीक विमा संघर्ष दिंडी (शेतकऱ्यांचा लॉंग मार्च) काढला आहे. शनिवारी (ता. ३०) सायंकाळी पीक विमा संघर्ष दिंडी वडवणी येथील आण्णाभाउ साठे चौकात जाताच तेथील शेतकऱ्यांनी संघर्ष दिंडी चे जोरदार स्वागत केले. यावेळी झालेल्या सभेत कॉ अजय बुरांडे बोलत होते. पुढे बोलताना बुरांडे म्हणाले की किसान सभेनी मागील पाच महिन्या पासुन सर्वच शालकिय स्तरावर निवेदने व मोर्चे काढुन खरीप २०२० चा पिक विमा मिळावा ही मागणी केलेली आहे. परंतु शासन व पीक विमा कंपनी शेतकऱ्यांचा विचार करीत नाहीत. यावर्षी झालेल्या अतीवष्टीने पीकांसोबत जमीनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे २०२० व २०२१ चा पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी पीक विमा संघर्ष दिंडी काढण्यात आली आहे. या रेलीत शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत. झोपलेल सरकार जागे होउन पीक विमा कंपनीस शेतकऱ्यांचा पीक विमा मंजुर करण्यास भाग पाडावे अशी मागणी कॉ अजय बुरांडे यांनी केली आहे. यावेळी किसान सभेचे कॉ पांडुरंग राठोड, कॉ दत्ता डाके, कॉ मुरलीधर नागरगोजे यांनीही सभेस संबोधीत केले. पीक विमा संघर्ष दिंडीत कॉ गंगाधर पोटभरे, कॉ सुदाम शिंदे, कॉ विष्णु देशमुख, कॉ पप्पु देशमुख, कॉ बालासाहेब कडभाने यांच्यासह किसान सभेचे शेकडो कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले आहेत. शनिवारी (ता. ३०) सकाळी तेलगाव येथेही सभा झाली. तेलगाव ते वडवणी पर्यंत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी संघर्ष दिंडी चे स्वागत केले.
संघर्ष दिंडी चा शनिवार दुसरा दिवस होता. तेलगाव येथुन शेकडो शेतकरी सहभागी झाले. तरूण शेतकऱ्यांचा सहभाग मोठया प्रमाणात आहे. पीक विमा मिळाल्या शिवाय परतायचा नाही हा दृढ निश्चय तरूणांनी केलेला दिसुन येत आहे.
संघर्ष दिंडीत सहभागी तरूण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर क्रांतीकारी गीते सादर करूण शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत.
दिंडीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची चहा, पाणी, नाष्टा, जेवन व राहण्याची सोय मार्गावर असलेले शेतकरी करीत आहेत.