
दैनिक चालु वार्ता /
निलंगा प्रतिनिधी /
राहुल रोडे
लातूर : – लातूर येथे पत्रकार परिषद संपन्न झाली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पूर परिस्थितीमुळे जमिनी खरवडून गेल्या आहेत. अशा संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये एवढी मदत तातडीने करणे गरजेचे आहे.
मराठवाड्यात गेल्या १५ दिवसांत अतिवृष्टीमुळे २५० मंडळात शेकडो लहान-मोठी जनावरे दगावली आहेत, अनेक पक्की घरे पडली आहेत, खरिपाचे पीक १००% वाया गेले आहे, सोयाबीन, कापूस ही पिके हातची गेली आहेत. एवढी भयानक परिस्थिती मराठवाड्याने आजवर कधीही अनुभवली नव्हती.
खरे तर ही परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत द्यायला हवी होती. मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याची महाविकास आघाडी सरकारची इच्छाच नाही असे दिसून येते.
मागील वर्षी सुद्धा झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. निदान यावर्षी तरी राज्य सरकारने पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवत न ठेवता शेतकऱ्यांपर्यंत थेट मदत, पोहोचवून त्यांना संकटमुक्त करावे.
माननीय मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पंचनामे व नुकसानीच्या अहवालांची वाट न पाहता मदत जाहीर करावी. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा आमदार श्री.रमेशजी कराड, आमदार श्री.अभिमन्यूजी पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे व जिल्ह्यातील सर्व पक्ष पदाधिकारी यांची उपस्थिती होती.