
दै .चालु वार्ता
लातूर प्रतिनिधी :केंद्रे प्रकाश
मुंबई : – प्रकाशन विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विशेष पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून म्हणजेच 1 ते 5 नोव्हेंबर या काळात प्रकाशन विभाग, 701, सी विंग, केंद्रीय सदन, सेक्टर 10, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजित हे पुस्तक प्रदर्शन कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. कोविड-19 अनुरूप व्यवहारांचे पालन करून आयोजित करण्यात येत असलेल्या या पुस्तक प्रदर्शनामध्ये किमान 20 टक्के ते कमाल 90 टक्के इतक्या सवलतीच्या दराने प्रकाशन विभागाची पुस्तके खरेदी करण्याची संधी वाचकांना मिळणार आहे.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील इतर व्यक्ती आणि घटना या संबंधीची तसेच इतिहास, कला, संस्कृती, विज्ञान, अर्थ आणि क्रीडा अशा अनेक विषयांची सर्व वयोगटांसाठी उपयुक्त ठरणारी पुस्तके या प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय प्रकाशन विभागाची योजना, कुरुक्षेत्र, बालभारती आणि आजकल ही मासिके तसेच एम्प्लॉयमेंट न्यूज/रोजगार समाचार हे साप्ताहिक आदी प्रकाशनेही प्रदर्शनादरम्यान विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. अधिक माहितीसाठी 022-27570686 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच dpdsenavimumbai@gmail.com या ईमेल वर संपर्क साधता येईल.