
दै चालु वार्ता वृत्तसेवा
लखनऊ : समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.सर्वच राजकीय पक्षांकडून उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये निवडणुका होणार आहेत. सध्या अखिलेश यादव हे आझमगडमधून सपाचे खासदार आहेत. एकेकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले अखिलेश यादव यांना समाजवादी पार्टीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा मानलं जात होतं, परंतु आपण निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
अखिलेश यादव म्हणाले की, “समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल (RLD) यांची राज्यातील निवडणुकासाठी युती झाली आहे. आरएलडीसोबत आमची युती ठरली असून लवकरच जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल.” तसेच निवडणुकीत काका शिवपाल यादव यांच्या प्रगतीशील समाजवादी पार्टी लोहियाला (पीएसपीएल) सोबत घेण्याच्या शक्यतेवर ते म्हणाले, “मला त्यांच्यासोबत युती करण्यात कोणतीही अडचण नाही. त्यांना आणि त्यांच्या पक्षातील लोकांना योग्य आदर दिला जाईल असेही यावेळी बोलताना म्हणाले.