दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
प्रा. गणेश शिंदे यांचे संत विचारांवर विशेष व्याख्यान.
देगलूर :
वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकरांनी एकशे पाच वर्ष समाजमनात आदर्शांची रुजवणूक करण्यासाठी अविरतपणे झिजले. अध्यात्मिक, सामाजिक, संस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात एक उच्च आदर्श प्रस्थापित केला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजमनात सद्विचारांची आणि संस्कारांची रुजवणूक व्हावी या भूमिकेतून देगलूर शहरात वसुंधरारत्न स्मृति व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मंगळवार दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०५: ३० वाजता नगरेश्वर मंदिर सभाग्रह देगलूर येथे द्वितीय व्याख्यानपुष्प आयोजित करण्यात आले आहे. या वसुंधरारत्न स्मृति व्याख्यानमालेचे पहिले पुष्प महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवावक्ते श्री. गणेश शिंदे हे गुंफणार आहेत. ‘अस्वस्थ वर्तमानात संतांचा संदेश’ या महत्त्वाच्या विषयावर श्री. गणेश शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान शिवलिंग बादशहा मठ संस्थानचे मठाधिपती सद्गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर हे भूषवणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ही व्याख्यान संपन्न होणार आहे.
‘जीवन सुंदर आहे’ अशा विविध विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करणारे महाराष्ट्रातले एक तरुण असे कृतिशील वक्ते म्हणून गणेश शिंदे यांचा परिचय आहे. प्रबोधन प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजाच्या उत्कर्षासाठी अनेक रचनात्मक असे विधायक उपक्रम राबवण्यात त्यांची ख्याती सर्वश्रूत आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या नॅशनल इनस्टीटूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजि या संस्थेचे मुख्य सल्लागार म्हणून काम पाहतात. अशा अभ्यासू आणि तडफदार वक्त्याचे व्याख्यान म्हणजे देगलूर परिसरातील नागरिकांसाठी एक वैचारिक मेजवानीच आहे. म्हणून देगलूर परिसरातील जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांनी या व्याख्यानमालेचा सहकुटुंब उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर व्याख्यानमाला समितीच्या वतीने करण्यात आले आहे.