दैनिक चालु वार्ता मोखाडा प्रतिनिधी-
खोडाळा : आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील गिरीवासी सेवा मंडळ कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून ‘ राष्ट्रीय सेवा योजना ‘ दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालाय परिसरात यानिमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून वृक्षारोपण करण्यात आले.
युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होत असताना दिसत आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय.
‘Not me, but you’ माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. आपले उज्ज्वल भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो म्हणून फूल ना फुलाची पाकळी या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवक करीत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्हाप्रमाणे आजचा स्वयंसेवक हा बोधचिन्हाच्या आठ आरेनुसार अष्टौप्रहर समाजसेवेसाठी बांधील आहे व लाल रंग हे तरुणांचे सळसळते रक्त हे राष्ट्र उभारणीसाठी असल्याचे दिसून येते. असे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक कडलग यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रवर्तन काशीद, एशियन पैंट्सचे राहुल पाटील, हिरा इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे संचालक प्रमोद गवळी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. यशवंत शिद, प्रा. तुकाराम रोकडे, प्रा. मेघा सोनटक्के, प्रा. मयुरी नागवंशी आदींसह स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.नवनाथ शिंगवे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एन एस एसच्या गीताने करण्यात आली.