दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अंबानगरीत आले होते व पत्रपरिषदेला संबोधितही केले.मात्र,स्थानिक आमदार दिसत नसल्याचा प्रश्न एकाने उपस्थित केला अन् हा पक्षांतर्गत विषय असल्याचे सांगत नाना पटोले यांनी वेळ मारून नेली.त्यानंतर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी जाहीर पत्रक काढून अनुपस्थित राहण्यामागचे कारणच स्पष्ट केले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले असता आपण त्यांची भेट घेवू शकले नाही.त्यांच्या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमामध्ये मला हजर राहता आले नाही.त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे आ.सुलभा खोडके यांनी पत्रकात म्हटले आहे.
त्यामागील कारण स्पष्ट करताना त्या म्हणाल्या,एका माजी आमदारांनी १८ जून २०२१ रोजी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश आहे.पक्षात प्रवेश घेतल्यानंतर आजपर्यंत मला स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांकडून कोणत्याही बैठकीला बोलाविण्यात आले नाही.तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या दोन दिवसीय अमरावती दौऱ्यासंदर्भात मला कुठलेही निमंत्रण नव्हते.यापूर्वी देखील आपण या संदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण यांना अवगत केले आहे,असेही आ.खोडके म्हणाल्या.स्थानिक पदाधिकारी आपणास डावलत असल्याचेही त्यांनी या पत्रकामधून स्पष्ट केले आहे.तर लवकरच या संदर्भात आपण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.