
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:शनिवारच्या भाजीपाला बाजारात गेल्या कांही महिन्यापासून फळ विक्रेते फळगाडे उभे करून भाजीपाला खरेदी विक्रीला अडचण निर्माण करून प्रचंड दादागिरी करीत आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिला- मुलींना खूप त्रास होत आहे. अगदी जवळच पोलीस स्टेशन असून देखील पोलीस प्रशासन किंवा नगरपरिषद प्रशासन महिलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करीत आहेत. भाजीपाला खरेदीसाठी बाजारात येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांनी पुढाकार घेऊन फळ विक्रेत्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा. अशी मागणी करण्यात येत आहे. दर शनिवारी देगलूर येथे आठवडी भाजीपाला बाजार असतो. पोस्ट
ऑफिस ते राजुरकर निवास, पोलीस स्टेशन ते बसवेश्वर पुतळा, नगरपरिषद जुनी इमारत ते नगरेश्वर मंदिर, नवीन सराफा मार्केटसह खूप माठ्या भागात देगलूर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी व व्यापारी भाजीपाला आणून विकतात. भाजीपाला विक्रेते रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजपाला ठेवून विक्री करतात. जोपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसून भाजीपाला विक्रेते भाजी विक्री करीत होते तोपर्यंत भाजीपाला खरेदी करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसे. गेल्या कांही महिन्यापासून फळ विक्रेते आपले फळगाडे भाजीपाला विक्रेत्यांच्या मधोमध भर रस्त्यात लावून अडचण निर्माण करीत आहेत. पोलीस स्टेशनची डावी बाजू ते जुनी रुग्णसेवा मंडळ इमारत, नगरपरिषद जुनी इमारत ते नगरेश्वर मंदिर या भागात फळगाडे उभे करून बाजारात अडचण निर्माण केली जात आहे. भाजीपाला विक्रेत्यांना अडचण होत असल्यामुळे या फळगाडे वाल्यांना बाजूला जाण्यास सांगू लागतात. त्यांना हे फळगाडेवाले अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन हातघाईवर प्रकरण येत आहे. भाजीपाला खरेदी करणारांपैकी कुणी ‘फळगाडा बाजूला लावा, गर्दीत गर्दी आणू नका’ असे म्हणताच त्यांनाही फळ गाडीवाले दमदाटी करीत आहेत. या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही टारगट मंडळी महिला-तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. महिलांना जाणीवपूर्वक धक्के देत आहेत. या फळ विक्रेत्यांमध्ये एकजूट असल्यामुळे चुकीच्या गोष्टीचा विरोध करण्याची सामान्य जनतेची हिंमत होत नाही. त्यामुळे या लोकांची दादागिरी वाढत चालली आहे.. अशा प्रकारातूनच कांही दिवसांपूर्वी शरीफ जनरल स्टोअर समोर एकाशिक्षकाला मारहाण करण्यात आली होती.