दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
महाराष्ट्र राज्य कराटे संघटनेच्या वतीने पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळूंगे येथे झालेल्या 43 व्या राज्यस्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत एकूण 16 पदके पटकावली. यात 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेत 28 जिल्ह्यातील एकूण 1527 खेळाडूंनी काता आणि कुमिते प्रकारामध्ये सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत औरंगाबादच्या मनिष धावणे, सुमित जाधव, नरेंद्र संतान्से, रेखा मिरकर, दिपाली जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले. तसेच अनिल मिरकर यांच्यावर एरिना इन्चार्ज म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. विजेत्या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक अनिल मिरकर, संतोष भालेराव, प्रफुल्ल दांडगे, विश्वदिप गिऱ्हे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विजेत्या खेळाडूंचे जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, जिल्हा संघटना अध्यक्ष मुरलीधर जगताप, तुकाराम मुंडे, जसवींदर कौर, आशा मुंडे यांनी अभिनंदन करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू समिक्षा मांजरमे हिने 56 ते 59 वजन गटात पुणे, नागपूर व अंतिम लढतीत मुंबईच्या खेळाडूला पराभूत करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. 6 वर्षाखालील गटात आरव मिरकरने काता व कुमिते प्रकारात सांगली, मुंबई उपनगर व फायनलमध्ये गोंदियाच्या खेळाडूला हरवत सोनेरी यश मिळवले. 12 वर्षाखालील 45 किलो वजन गटात आदित्य राठोडने जळगाव, सातारा व अंतिम फेरीत रायगडच्या खेळाडूला नमवत सुवर्णपदक आपल्या खात्यात जमा केले.
त्याचबरोबर, 10 वर्षाखालील गटात अंशुमन मिरकरने अहमदनगर, बीड फायनलमध्ये मुंबईच्या खेळाडूला पराभूत करत काता प्रकारात सुवर्णपदक जिंकले, तर कुमिते प्रकारात त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. रौप्यपदक – युवराज जैस्वाल, विराज भालेकर, स्वानंदी कुलकर्णी, सृष्टी अकोलकर. कांस्यपदक – तनिष रिठे, आर्यन घुमरे, प्रथमेश पंडित, अंशुमन मिरकर, स्वानंदी कुलकर्णी, रोहिणी बनसोडे आणि ओजल सूर्यवंशी.