
दैनिक चालु वार्ता,शिरपूर
प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील द्विवार्षिक निवडणुकीचा बिगुल मंगळवारी वाजला.त्यासाठी १० डिसेंबरला मतदान, तर १४ डिसेंबरला मतमोजणीसह निकाल जाहीर होईल. या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची पंचवार्षिक निवडणूक सुरू असताना विधान परिषदेच्या मतदारसंघासाठीही निवडणूक जाहीर झाल्याने महिनाभर राजकीय वातावरण तापणार आहे.
विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती दिली. निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर उपस्थित होते. धुळे आणि नंदुरबारचे निवासी उपजिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील. कोरोनासंबंधी नियम पाळून ही प्रक्रिया पार पाडली जाईल.
विधान परिषद निवडणुकीसाठी १६ नोव्हेंबरला अधिसूचना प्रसिद्धी, २३ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असेल. दाखल अर्जांची २४ ला छाननी, २६ ला माघारी आणि १० डिसेंबरला सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत धुळे जिल्ह्यातील चार तहसील कार्यालये, तर नंदुरबार जिल्ह्यातील सहा तहसील कार्यालयांतील मतदान केंद्रात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मतमोजणीसह १४ डिसेंबरला निकाल जाहीर होईल.
निवडणुकीसाठी भाजपकडून विधान परिषदेचे शिरपूरस्थित विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल उमेदवार असतील. याविरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेनेला की अन्य कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते याविषयी उत्कंठा असेल. शिवसेनेला उमेदवारी दिली तर नंदुरबार जिल्ह्यातून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी किंवा त्यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी या उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आघाडीतील काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उमेदवारीसाठी दावा होतो किंवा नाही याविषयी उत्सुकता असेल. या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच सरळ लढत होण्याचे संकेत आहेत.
दोन नगरपंचायती मतदानातून बाद
विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघात सरासरी ७५ टक्के मतदार असल्याने ही निवडणूक जाहीर झाली. साक्री व धडगाव नगरपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती आहे. त्यामुळे या नगरपंचायतींची बॉडी विसर्जित झाली आहे. या नगरपंचायतीत पूर्वी प्रत्येकी १९ म्हणजेच एकूण स्वीकृतसह ३८ नगरसेवक निवडून आले होते. त्यात साक्री येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शरद भामरे यांचे कोरोनाकाळात निधन झाले. प्रशासकामुळे या नगरपंचायतींचा मतदान प्रक्रियेत सहभाग राहणार नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
धुळे महापालिकेतील लोकसंग्राम संघटनेच्या सदस्या हेमा अनिल गोटे यांनी राजीनामा दिल्याने व भाजपचे स्वीकृत सदस्य सोनल शिंदे यांना निवडणूक खर्च सादर न केल्याने त्यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविल्याने दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे धुळे महापालिकेचे ७७ सदस्य आहेत. तसेच साक्री व धडगाव नगरपंचायतीवर प्रशासक आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी मतदारांची संख्या ३९९ झाली आहे. ती अशी (स्वीकृत सदस्य व जिल्हा परिषद सदस्य असलेल्या पंचायत समिती सभापतींसह) : धुळे जिल्हा परिषद- ६०, धुळे महापालिका- ७७, शिरपूर नगर परिषद- ३४, दोंडाईचा नगर परिषद- २८, शिंदखेडा नगरपंचायत- १९, नंदुरबार जिल्हा परिषद- ६२, नंदुरबार पालिका- ४४, नवापूर पालिका- २३, शहादा पालिका- ३१, तळोदा पालिका- २१. एकूण- ३९९.
धुळे-नंदुरबार
पक्षीय बलाबल
भाजप……….१९९
काँग्रेस……….१३६
राष्ट्रवादी………०२०
शिवसेना……..०२०
एमआयएम……००९
समाजवादी…….००४
बसप………….००१
मनसे………….००१
अपक्ष………….००९
एकूण………….३९९