
भिगवन प्रतिनिधि जुबेर शेख
मागील काही दिवसांपासून एस. टी.कर्मचारी त्यांच्या मागण्यांकरिता संप करून आंदोलन करीत आहेत.प्रत्येक राज्यकर्त्यांच्या पाच वर्षांच्या काळात किमान दोन वेळा एस. टी कर्मचारी त्यांच्या पगार वाढीच्या व सोयी सुविधांच्या बाबतीत संघटितपणे राज्यसरकार कडे आशेने काही मागण्या करत असतात, परंतु आजवर त्यांच्या मागण्या पूर्णपणे कधीही कुठल्या ही सरकारने पूर्ण केल्या नाहीत.परंतु इतर पांढरपेशी शासकीय नोकरदार वर्गाच्या मागण्या मात्र अल्प संघर्षात मान्य होतात.इतर सरकारी नोकरांना भरमसाठ पगार वाढ मिळते,सोयी सुविधा,सवलती मिळतात परंतु दिवस रात्र आपला जीव धोक्यात घालून एस. टी कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असून देखील त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व इतर सुविधा मिळत नाहीत हे दुर्दैवी वास्तव आहे.
कित्येक वेळा राज्य शासनाकडे एस.टी महामंडळाची थकबाकी असते त्यामुळे वेळेवर कर्मचाऱ्यांना पगार देखील मिळत नाही व त्यामुळे दर पाच वर्षात एस.टी कर्मचारी हा संपावर गेल्याचे दिसते.त्यामुळे शासन आपल्यात व शासकीय कर्मचाऱ्यात दूजाभाव करत असल्याची भावना सध्या एस.टी कर्मचारी वर्गात निर्माण झाल्याचे चित्र आहे.
जेंव्हा शासन जनतेच्या, कामगारांच्या,कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढत नाही तेंव्हा आपले प्रश्न सरकार दरबारी मांडण्या करिता संविधानिक पद्घतीने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला असताना व सध्य स्थितीत या चालू आंदोलनादरम्यान राज्य सरकार दिसून आंधळेपणाची भूमिका घेत असल्याचे पाहून ३६ एस. टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार आंदोलकांच्या मागण्यांची पूर्तता न करता त्यांच्यावर निलंबनाचे शस्त्र उगारून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. हे निंदनीय व निषेधार्ह आहे. ही निलंबनाची कारवाई सरकारने थांबवावी व निलंबित कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेत रुजू करून घ्यावे. तसेच एस.टी महामंडळाचे राज्य शासनात विलागिकरण करण्यात यावे ह्या मागण्यांसह एस.टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्य सदस्य श्री महेंद्र मदने यांनी वरील आशयाचे पत्र देऊन एम एम संगटना ही एस टी कामगार वर्गाच्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले.बऱ्याच दिवसांपासून एस.टी चे राज्य शासनात विलागिकरण करण्यात यावे ही बऱ्याच दिवसांची मागणी असताना अद्याप त्यावर कोणत्याही सरकार ने निर्णय घेतला नाही.
यावेळी इंदापुर तालुका अध्यक्ष श्री.विशाल चव्हाण; संपर्कप्रमुख श्री.चन्द्रकांत चव्हाण;पुणे जिल्हा संपर्कप्रमुख श्री.निखिल जाधव तसेच कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.