
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी:- माधव गोटमवाड
आजघडीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी घेऊन कामगार संपावर गेलेले आहेत. महाराष्ट्राची एस.टी. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा तसेच दैनंदिन गरजेचा विषय आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना वेळेवर आणि सुखरूप शाळेला पोहोचवणारी एस. टी. ,शेतकरी, कष्टकरी यांना तालुक्यावर, जिल्ह्यावर किफायतशीर दरात पोहोचवणारी एस. टी., सर्वसामान्य नोकरदारांना वेळेत कार्यालयात पोहोचवणारी एस.टी., ग्रामीण भाग आणि वाडी ,वस्ती , तांडे येथील गोरगरीब जनतेला दवाखान्यात पोहोचचणाऱ्या एस.टी. ला आज घरघर लागली आहे. एस. टी कामगारांच्या वाढत्या आत्महत्या या चिंताजनक असून राज्य सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणणाऱ्या आहेत.
लालपरी ही महाराष्ट्रातील गोरगरीब, कष्टकरी जनतेची रक्तवाहीनी आहे. महाराष्ट्रातील इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एस टी कर्मचारी उन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता काम करतात. राज्य परिवहन कर्मचान्यांची मागणी आहे की महामंडळाचे पुर्णपणे राज्य सरकारमधे
विलिनीकरण करा व इतर कर्मचाऱ्यांनप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत ते सर्व मान्य करण्यात यावेत
सदरील एसटी कामगारांच्या संपाला युवा क्रांती दलाचा जाहीर पाठिंबा असून आम्ही कायम आपल्या सोबत आहोत. गरज पडल्यास आपल्यासाठी रस्त्यावर उतरण्याची देखील आम्ही ग्वाही देतो. तसेच राज्यसरकारचा आम्ही जाहीर निषेध नोंदवत आहोत. आजपर्यंत ज्या एस.टी. कामगारांचे निलंबन राज्य सरकारने केलेले आहे त्यांना सेवेत परत रुजू करून घ्यावे ही आमची भूमिका आहे. सर्वसामान्यांची एस.टी. टिकली पाहिजे आणि ती जर टिकवायची असेल तर आधी एस. टी. कामगार टिकलाच पाहिजे असे युवाक्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष केतन देशमुख यांनी म्हटले .
यावेळी प्रशांत पाटील मुंगल प्रदेशाध्यक्ष,प्रथमेश पाटील तेलंग प्रवक्ता व युवाक्रांती दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.