
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
भारत जोडो यात्रेत राज्यात निरोप घेताना राहुल गांधी यांचा संदेश…
मुंबई : महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज या महापुरुषांची आणि संतांची भूमी आहे.
महाराष्ट्राने समता, स्वातंत्र्य, बंधुभावाचा विचार देशाला दिला. या महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीचा गंध आणि विचार घेऊन आम्ही भारत जोडो यात्रा पुढे घेऊन जात आहोत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भारत जोडो यात्रेचे मध्य प्रदेशात प्रस्थान होण्यापूर्वी राज्यात यात्रेला जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत.
राहुल गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, भारत जोडो यात्रेचा शुभारंभ देगलूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन झाला आणि छत्रपतींचा मातृ जिल्हा, (जिजाऊ मांसाहेबांचा जन्म जिल्हा) बुलढाणा येथून ती मध्य प्रदेशमध्ये जात आहे. महाराष्ट्रातील छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा, गजानन महाराज तसेच येथील सर्व संतांनी समता, सामाजिक न्याय व बंधुत्वाचा विचार दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा आणि भारत जोडो यात्रेचा हाच संदेश आहे. तोच विचार घेऊन आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत.
महाराष्ट्रातील जनतेने या यात्रेला प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम दिले. आमच्यासोबत बरोबरीने चालले, लाखोंच्या संख्येने नांदेड आणि शेगाव येथील सभेमध्ये सहभागी झाले. या सर्व आबालवृद्ध, युवक, महिला यांच्या प्रेमाने आमचे हृदय, मन भरून आले आहे. महाराष्ट्रात आम्ही अशा लोकांचे ऐकले जे कठोर परिश्रम करतात, परंतु त्यांच्या श्रमाचे फळ त्यांना मिळत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे गंभीर झालेले प्रश्न, कृषी साहित्याच्या किमतीत झालेली भाववाढ, शेतमालाच्या भावात असलेली अनियमितता आणि फसलेली पीकविमा योजना यांनी शेतकऱ्याला गरिबीच्या दुष्टचक्रात ढकलेले आहे, हे पाहून मन व्यथित झाले. अनेक बेरोजगार युवक उच्च शिक्षण घेऊनही काम नसल्याने हतबल झालेले, आपल्या स्वप्नाचा चुराडा झालेले पाहिले. आदिवासी समुदाय हा या देशाचा मूलनिवासी आहे आणि त्याच्या अधिकारावर गदा आलेली आहे. या सगळय़ा समस्यांची कारणमीमांसा करताना असे लक्षात आले की, काही लोकांच्या हातामध्ये सत्ता आणि संपत्ती सीमित ठेवण्याचे भाजपचे धोरण याला कारणीभूत आहे. एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या विरोधात संस्कृती, धर्म, जात आणि भाषा यांचा वापर करून संघर्ष उभा करण्याच्या भाजपच्या नीतीमुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे, असे राहुल गांधी म्हणतात. आम्ही अतिशय विनम्रतापूर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र भूमी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जात असताना महापुरुषांच्या व संतांच्या या पुरोगामी मातीचा गंध, विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला देत आहोत.