दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा
युवा अभिनेता म्हणून नावलौकिक
जव्हार:-जव्हार तालुका हा तसा डोंगरदऱ्या आणि आदिवासी बहुल भाग असलेला तालुका असून सध्याच्या आधुनिकतेच्या युगात व स्पर्धेत टिकण्यासाठी या आदिवासी तालुक्यातील अनेक तरुण बांधव विविध अडचणींचा सामना करतांना व येणाऱ्या समस्यांशी दोनहात करीत आहेत.या आदिवासी तरुण बांधवांच्या अंगी कलागुण व कौशल्य असतानाही अपुऱ्या सोयी सुविधा,योग्य मार्गदर्शनाचा अभाव अशा कारणाने अनेक तरुण आपली इच्छाशक्ती असूनही मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत.परंतु या सर्व परिस्थितीवर मात करून भविष्यात एक उगवता आदिवासी अभिनेता म्हणून उदयास आलेल्या यशवंत तेलम या आदिवासी तरुणाने आपली जिद्द आणि चिकाटीच्या बळावर अभिनय क्षेत्रात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.
डोंगरवाडी या ग्रामीण आणि छोट्याशा गरीब आदिवासी कुटुंबात जन्म घेतलेल्या यशवंतने चित्रपट क्षेत्रात अभिनयाची छाप पाडली आहे.आई-वडील अशिक्षित असूनही पदवीपर्यंतचे शिक्षण परंतु अभिनय क्षेत्राची आवड असल्याने येणाऱ्या अडचणींचा सामना करून या तरुणाने सिनेसृष्टीत काम करण्याची जिद्द मनाशी बाळगली.अनेक नाटके,लघु चित्रपट,आदिवासी संस्कृती जोपासना व्हावी यासाठी रचलेली विविध प्रकारची गीते त्यामुळे त्यांची एक वेगळीच ओळख त्यांनी आपल्या समाजात निर्माण केली.महाराष्ट्राचे हास्य सम्राट आणि अभिनेते भाऊ कदम यांच्यासोबत मुख्य नायकाच्या भूमिकेत त्यांनी ‘घुसाडी’ सारख्या चित्रपटात काम करून मिळालेल्या संधीचे सोने केले.
सध्या आपल्या ‘यश फिल्म’ या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपल्या आदिवासी समाजाचे सामाजिक विषय हाती घेऊन पारंपारिक संस्कृती टिकविण्यासाठी आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृतीचे काम अभिनयाच्या माध्यमातून हाती घेऊन समाजाला योग्य दिशा देण्यासाठी अनेक लघु चित्रपटांची निर्मिती करून आपले नाव सिने सृष्टीत भक्कम करण्याचे काम करीत आहे.म्हणून त्यांना आतापर्यंत अनेक सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.