
दैनिक चालू वार्ता
म्हसावद सर्कल प्रतिनिधि
(सुनिल पाटिल)
महाराष्ट्र शासनाने सर्व राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करून घ्यावे; यासाठी सुरु असलेल्या कर्मचार्यांच्या संपाला नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्याही वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.हा पाठिंबा जाहीर करताना मुख्यमंत्री यांना उद्देशून निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने शासकीय सेवेत विलीनीकरण करून घ्यावे.तसेच वर्षानुवर्षे दिवस-रात्र सेवा बजाविणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांना इतर सर्व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन व त्या संबंधातील सर्व सोई-सुविधा शासनाने त्वरित लागू कराव्यात. यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्यावतीने सर्व कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या या संपाला जाहीर पाठिंबा देत आहोत. शासनाच्यावतीने सदर संपामुळे कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक कार्यवाही केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सर्व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, याची देखील शासनाने नोंद घ्यावी. एस.टी. महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना जे वर्षानुवर्षे अतिशय कमी वेतनावर काम करीत आहेत, त्या सर्व कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या परिवाराचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस राम विठ्ठल साळुंके, युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, युवक शहराध्यक्ष सुलतान पिंजारी, रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण वाघ, युवक शहर उपाध्यक्ष गणेश शिरसाठ, आदिवासी बिग्रेड सुरेंद्र ठाकरे, तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांच्या स्वाक्षरी आहेत.