
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नांदेड :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व प्रमुख जिल्हा न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत ल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यामार्फत 2 ऑक्टोंबर ते 14 नोव्हेंबर 2021 याकालावधीत संपूर्ण नांदेड जिल्ह्यात विविध माध्यमांद्वारे कायदेविषयक जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या हस्ते 2 ऑक्टोंबरला करण्यात आले होते. 46 दिवसांच्या या कालावधीमध्ये निरंतर विविध कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम ग्रामीण व शहरी भागात जावून घेण्यात आले. या महोत्सवाची सांगता नांदेड जिल्हा न्यायालयात आज करण्यात आली.शासकीय योजनांचा महामेळाव्यात कायदेविषयक शिबिर, डोअर-टू-डोअर कॅम्पियन, मोबाईल व्हॅन, विविध धार्मिक स्थळे येथे कायदेविषयक जनजागृती बाबत स्टॉल, पथनाट्य याद्वारे नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहचून कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण होण्यासाठी कायदेविषयक विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमांद्वारे नांदेड जिल्ह्यातील 2 हजार 816 गावे व ठिकाणी 1 हजार 515 संघातील 4 हजार 794 व्यक्तीद्वारे सुमारे 18 लाख नागरिकांना कायदेविषयक माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 13 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याच्या सिमेच्या शेवटच्या टोकावर अतिशय दुर्गम भागात असलेल्या किनवट तालुक्यातील मांडवी येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजीत करण्यात आला होता.
या महामेळाव्यात सर्व प्रकारची वैद्यकिय तपासणी, रक्तदान शिबिर, डोळयाची तपासणी, कोविड-19 चे लसीकरण, पशुवैद्यकिय तपासणी व उपचार, दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हिलचेअरचे वाटप, शेतकऱ्यांना 3 ट्रक्टरचे वाटप, घरकूल वाटप, जातीचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, वय व अधिवास प्रमाणपत्र, मतदानकार्ड, तिनशे शेतकऱ्यांना मोफत सात बारा उतारांचे वाटप करण्यात आले. अशा अनेक शासकीय सुविधांचा आणि योजनांचे शासकीय 75 स्टॉल मार्फत नागरिकांना लाभ देण्यात आला.
हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा न्यायाधिश श्रीकांत आणेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र रोटे, किनवटचे उपविभागीय अधिकारी किर्तीकुमार पुजार, तहसीलदार श्रीमती डॉ. मृणाल जाधव, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, दिवाणी न्यायाधिश किनवट आणि किनवट येथील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन यशस्वी केला.
या महोत्सवाची सांगता 14 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्हा न्यायालयात करण्यात आली. याप्रसंगी भव्य रॅली / प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये नांदेड येथील न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना “बाल दिन” निमित्त शुभेच्छा देवून प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिस वितरण करण्यात आले.