
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : सूर्यच्या भूमिकेला प्रेक्षक-समीक्षकांकडून दाद मिळाली. मात्र ही भूमिका साकारण्यासाठी अक्षयने कोणत्या पोलीस अधिकाऱ्याकडून प्रेरणा घेतली, हे तुम्हाला माहित आहे का? अक्षयने मुंबई शहराचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून प्रेरणा घेतली.
याविषयी बोलताना अक्षय म्हणाला, विश्वास नांगरे पाटीलजी हे चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेसाठी माझे प्रेरणास्थान आहेत हे सांगण्यास मला अजिबात संकोच वाटत नाही. मी त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो, आणि इतका प्रामाणिक आणि ऑन पॉइंट असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला पाहून मी प्रभावित झालो.”
‘सूर्यवंशी’ चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारण्यासाठी एका आयपीएस अधिकाऱ्याकडून प्रेरणा घेणं हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं त्याने सांगितलं. “ते बाहेरून कठोर असले तरी मनाने प्रेमळ आहेत. कारण आपल्या कर्तव्याचा एक भाग म्हणून ते अनेक चांगली कामं करतात. कोविड महामारीच्या संकटात त्यांनी आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या टीमचं नेतृत्व केलं. तसंच ते तंदुरुस्त आहेत आणि त्यांच्या आरोग्यासाठी मेहनत घेतात. माझ्या भूमिकेसाठी त्यांच्याशिवाय दुसरा कोणता रोल मॉडेल असूच शकत नाही”, असं अक्षय पुढे म्हणाला.
विश्वास नांगरे पाटील हे 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी दक्षिण मुंबईतील झोन-1 चे पोलीस उपायुक्त होते. त्यांनी 26 नोव्हेंबर रोजी कुलाबा येथील ताज हॉटेलमध्ये टीमचे नेतृत्व केले आणि एका दहशतवाद्याला ठार केलं. 2015 मध्ये त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. मॅरेथॉनवरील प्रेम आणि तंदुरुस्त पोलीस दल यामुळे ते चर्चेत होते. ते नाशिक शहराचे माजी पोलिस आयुक्तही राहिले आहेत.