
दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवि दिल्ली : सीएनएन न्यूज 18 ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. एक म्हणजे 20 नोव्हेंबरपूर्वी त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा किंवा मग विरोधी पक्ष संसदेत बदल घडवून आणतील. दोन्ही पर्यायांमध्ये इम्रान खान यांना पद गमवावं लागणार हे निश्चित आहे.
येत्या आठवड्याभरात सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाची मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट आणि पाकिस्तान मुस्लिम लीग यांच्या समवेतची युती तुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, पीटीआयकडून परवेझ खट्टक आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) या पक्षाकडून शाहबाज शरीफ यांची नावं पंतप्रधानपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची (Economy) बिकट स्थिती आणि प्रमुख ठिकाणी हिंसक निदर्शनं करणाऱ्या टीएलपी (TLP) गटाच्या मागण्या मान्य करण्याचा इम्रान खान यांचा निर्णय त्यांना गोत्यात आणणारा ठरला असून, त्यांच्या विरोधात देशातल्या जनतेत प्रक्षोभ निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं आहे. पाकिस्तानमधल्या या राजकीय घडामोडींकडे भारताचंही बारीक लक्ष आहे. तिथली राजकीय स्थिती काय वळण घेते याकडे राजकीय अभ्यासकांचं आणि राजकारण्यांचंही लक्ष लागलं आहे.