
दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : केंद्र सरकार खरोखरच गंभीर असेल तर लखीमपूर हत्याकांडावर मोदींनी मौन का बाळगले’, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी शुक्रवारी केंद्र सरकारला लक्ष्य बनवले. ‘उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये आगामी चार महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, हे मतदारांना माहिती नाही असे मोदी सरकारला वाटते का, विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळण्याची शक्यता नसल्याचे सर्वेक्षणात समोर आल्यामुळे मोदी सरकार माफी मागत आहे.
लखीमपूरमधील हत्याकांडानंतर राजकीय फासे उलटे पडू लागल्याचे संकेत मिळाल्याने भाजपने शेती कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
उत्तर प्रदेशातील ४०३ जागांपैकी १०० विधानसभा मतदारसंघ पश्चिम उत्तर प्रदेशात असून गेल्या वेळी भाजपला ७५ जागा मिळाल्या होत्या. पण, या भागामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले असून उत्तर प्रदेशात भाजपविरोधात प्रचार करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. लखीमपूरच्या घटनेनंतर शीख समाजामध्ये भाजपविरोधी वातावरणही वाढू लागल्याचे स्पष्ट झाले असून पश्चिम उत्तर प्रदेशमधील जाट, मुस्लीम आणि शीख मतदारांनी भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.
लखीमपूर हत्याकांडानंतर मोदी-शहांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना दिलेल्या अभयामुळे हिंदू-शीख समाजात दुफळीचा धोका निर्माण झाला होता. खलिस्तानवाद्यांकडून होणाऱ्या संभाव्य कारवायांचा मुद्दा पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सातत्याने मांडला होता आणि
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चाही केली होती.
शेती कायदे मागे घेण्याच्या निर्णयामुळे शीख समाजातील भाजपबद्दल वाढत असलेली नाराजी कमी होईल, असा भाजपचा कयास आहे.
उत्तर प्रदेशात लखीमपूरमध्ये झालेल्या आंदोलनात शेतकरी चिरडले गेल्याने भाजपविरोधी वातावरण तीव्र होऊ लागले होते.