
दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटकडे सध्या मोठ्या प्रमाणावर लसींची निर्मिती झाली आहे. मात्र त्याचा साठा करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नव्या लसींची साठवणूक करण्यात मर्यादा येत असल्याचं सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे कोव्हिशिल्ड लसीच्या 24 कोटींहून अधिक लसी तयार असून केंद्र सरकारने याबाबत मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
काय आहे समस्या? सीरम इन्स्टिट्यूटच्या सरकारी व्यवहारांचे संचालक प्रकाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोव्हिशिल्ड लसीचे 24,89,15,000 एवढे डोस तयार असून या स्टॉकमध्ये दररोज भर पडत चालली आहे.
संस्थेच्या गोडावूनमध्ये साठा करण्याची क्षमता संपत चालली असून यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हा वाढीव उत्पादनाचा साठा स्टोअर करण्यासाठी संस्थेला आपली साठवण मर्यादा वाढवण्याची गरज असून सरकारनं त्यासाठी त्वरित पुढाकार घेऊन तोडगा काढावा, असं अपील केंद्रीय आरोग्य खात्याला करण्यात आल्याचं कुमार यांनी म्हटलं आहे. इतर उत्पादनांवर होतोय परिणाम सीरम इन्स्टिट्यूट कोव्हिशिल्ड लसीव्यतिरिक्त इतरही अनेक औषधांची निर्मिती करत असते. त्यांच्या साठवणुकीत यामुळे मर्यादा येत असून भविष्यातील व्यवहार आणि इतर देशांतील ऑर्डर्स यांचा वेळेत पुरवठा करण्यात अडथळे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.