
दै चालु वार्ता वृत्तसेवा
बुलडाणा: बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यता आला होता. यावेळी पंकजा मुंडे यांची खदखद समोर आल्याचं पाहायला मिळालं. माझे माता-पिता माझे सर्वस्व तुम्ही आहात. तुम्हाला दहा परिक्रमा करेल, मला अजून कुठल्या परिक्रमेची आवश्यकता नाही.
भाजपने विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली आहे.मात्र, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा तिकीट नाकारण्यात आलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मनातील खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.
एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईल. पण कुणासमोर हात फैलावून कुठल्या पदाची मागणी करण्याची आमच्या रक्तात सवय नाहीये. एखादी संधी नाही मिळाली तर नाही. पण लोकांच्या सेवेची संधी सोडायची नाही ही शपथ गोपीनाथ मुंडे साहेबांना अग्नि देताना घेतली आहे. मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही, अशी खदखद पंकजा यांनी व्यक्त केली.
भाजपने दोन दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानुसार अमल महाडिक, अमरिश पटेल, चंद्रशेखर बावनकुळे, वसंत खंडेलवाल आणि राजहंस सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी पंकजा यांना यावेळीही विधान परिषदेची संधी दिली नाही. तर विधानसभेचं तिकीट कापण्यात आलेल्या बावनकुळेंना मात्र ही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद व्यक्त करतानाच पक्षश्रेष्ठींना अप्रत्यक्ष टोले लगावल्याचं सांगितलं जात आहे.