
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : किरीट सोमय्या म्हणाले, “सध्या जालना साखर कारखान्याचे दोन मालक आहेत. एक खोतकर परिवार आणि दुसरे मुळे परिवार.त्यातल्या एक भागधारक रुपाली विश्वास पाटील या आहेत. विश्वास नांगरे पाटील हे मुबंई पोलीस दलाचे सह आयुक्त आहेत.”
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केलेत.तसेच विश्वास पाटील यांना पोलीस दलाच्या नोकरीतून मुक्त करा, अशी मागणी केलीय. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.
“या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करा ”
“शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सांगू इच्छितो की जालना साखर कारखान्याची चौकशी स्टेटमेंट आल्यानंतर महिनाभरात बंद करण्यात आली. मुंबई पोलिसांनी ही सर्व चौकशी बंद करून न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला. या सर्व प्रकरणाची एकतर सीबीआय चौकशी करा किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करा.”
किरीट सोमय्या म्हणाले, “मुंबईचा एक पोलीस सह आयुक्त बेनामी पद्धतीने साखर कारखाना घेतो. दुसरा पोलीस सह आयुक्त मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेली चौकशी बंद करतो. जून २०१९ मध्ये स्वतः उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे तपास करण्याचे आदेश दिले होते. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत विश्वास नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त केलं पाहिजे.”
“शरद पवार यांनी दिलेली धमकी ही अनिल देशमुख की अजित पवार यांच्यामुळे? देशमुखांवर प्रेम आहे की अजित पवार यांची काळजी आहे?” असा खोचक सवालही किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.