
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुणे :मॅट विभागातून शिवराज राक्षेने तर माती विभागातून महेंद्र गायकवाडने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. ज्यानंतर फायनलमध्ये शिवराजने एकहाती विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 होण्याचा मान मिळवला आहे.
पुण्यात रंगलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 होण्याचा मान मिळाला आहे. अंतिम सामन्यात शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला काही मिनिटातंच थेट चितपट करत विजय मिळवला आहे.
दोघेही एकाच तालमीचे मल्ल
विशेष म्हणजे दोन्ही मल्ल हे पुण्याच्या तालमीतच तयार झाले आहेत. वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत दोघांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे वस्ताद काका पवार यांच्या शिष्याने यंदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.
महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी माती आणि गादी विभागातील फायनलच्या स्पर्धेत शिवराज आणि महेंद्र यांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. यावेळी आधी माती विभागातील अंतिम लढत झाली. ही अंतिम लढत अतिशय चुरशीची झाली. सोलापूरचा सिकंदर शेखआणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांनी एकमेंकाना तोडीस तोड खेळ दाखवला. अखेरपर्यंत दोघेही एकमेंकावर भारी पडत होते. पण अखेर 6-4 अशा फरकाने महेंद्रने सिंकदरला मात देत फायनलमध्ये धडक दिली. दुसरीकडे मॅट विभागातील अंतिम लढत पुण्याच्या राजगुरुनगरमधील शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात पार पडली. ही लढत फारच एकतर्फी झाल्याचं दिसून आलं शिवराजनं सुरुवातीपासून आपलं वर्चस्व सामन्यावर बनवलं आणि अखेर 8-1 अशा मोठ्या फरकाने सामना जिंकत फायनल गाठली.