
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : भारतानं ७३ धावांनी सामना जिंकून मालिका ३-० अशी खिशात घातली. पण, या विजयानंतर द्रविडनं खेळाडूंना एक मोलाचा संदेश दिला. राहुल द्रविड याच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या व रोहित शर्माच्या फुल टाईम नेतृत्वाखालील पहिल्या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला.रोहितचे अर्धशतक आणि अन्य फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर टीम इंडियानं ७ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला अन् प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १११ धावांवर माघारी परतला.
प्रथम फलंदाजी करताना रोहित- इशान किशन या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ६९ धावा चोपल्या. पण, मिचेल सँटनरच्या एका षटकात किशन ( २९) व सूर्यकुमार यादव ( ०) माघारी परतले. सँटनरनं पुढच्या षटकात रिषभ पंतलाही ( ४) माघारी पाठवले. रोहितनं दमदार खेळी करताना ३१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावा केल्या. वेंकटेश अय्यर ( २०) व श्रेयस अय्यर ( २५) यांनी चांगला खेळ केला. हर्षल पटेलनं १८ धावा केल्या. दीपक चहरनं ८ चेंडूंत २१ धावा चोपूलन भारताला ७ बाद १८४ धावांचा पल्ला गाठून दिला. त्यानं अखेरच्या षटकात १९ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडकडून मार्टीन गुप्तील ( ५१) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. अक्षर पटेलनं ९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलनं दोन, तर दीपक चहर, युझवेंद्र चहर व वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १७.२ षटकांत १११ धावांवर माघारी परतला.
”वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल खेळून दोन दिवसांच्या विश्रांती नंतर लगेच ट्वेंटी-२० मालिका खेळणे हे न्यूझीलंडसाठी खूपच आव्हानात्मक होते. पण, भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२च्या तयारीच्या दिशेनं योग्य पाऊल टाकले, ही आमच्यासाठी सकारात्कम बाब आहे,”असे द्रविड म्हणाला.
तो पुढे म्हणाला,”या मालिका विजयाचा आनंद आहे. मालिकेत प्रत्येकानं त्याच्यावरील जबाबदारी योग्य पार पाडली. ही चांगली सुरुवात आहे, परंतु आपल्याला वास्तवाचे भान राखायला हवं आणि मालिका विजयानं हुरळून न जाता जमिनीवर पाय ठेवायला हवेत. असेही तो यावेळी म्हणाला